जिन्सीत 14 लाखांचा गुटखा पकडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांच्या विशेष पथकाने गुटखा विक्री करणाऱ्या ठोक विक्रेत्यांवर छापा मारला. यावेळी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून १३ लाख ७६ हजार ७४० रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा जप्त करण्यात आला.
बंदी असलेला गुटखा शहरातील विविध भागात सर्रास विक्री करण्यात येत आहे. या गुटखा विक्रीकडे अन्न व औषधी  प्रशासन दुर्लक्ष करीत होते. शहरात कर्नाटक, मध्य प्रदेशातून गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संयुक्तरीत्या मंगळवारी रात्री मोंढा परिसरात ही कारवाई करण्यात आली.

मोंढ्यातील गोळ्या-बिस्कटच्या दुकानांच्या रांगेमध्ये राज पान शॉपवर पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, धनंजय पाडळकर, अजय दहिवाल, संजय ढोबळ, पोलीस उपनिरीक्षक गिते यांनी छापा मारून तनजीन शेख (रा. बेरीबाग, हर्सूल) यास ताब्यात घेतले. पथकाने गोदामातून विविध कंपन्यांचा गुटखा, तंबाखू, सुगंधी तंबाखू, तुळशी रॉयल जर्दासह अन्य पानमसालासह १३ लाख ७६ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गिते यांच्या पथकाने  जाफरगेट परिसरात छापा मारून नदीम यास ताब्यात घेतले. त्या दोघांनी गुटखा कुठून आणला, कोणी दिला, तो आमचा गुटखा नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासन अधिकारी बुचकाळ्यात पडले आहेत.

गुटखामाफियांची नावे सांगण्यास नकार
ह पोलिसांनी दोन गुटखामाफियांना पकडले असून, हा गुटखा शहरातच तयार करण्यात येत  असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे त्या दोघांची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांनी सांगितले. गुटखा शहरात तयार केला जात असला तरी त्याचे वितरण कुठे आणि कोण करते याचा शोध घेण्यात येत आहे. गुटखामाफियांविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांची नावे सांगण्यास पोलिसांनी स्पष्ट नकार दिला.