अश्रुधुराच्या नळकांड्या जिवावर बेतल्या, वृद्ध शेतकऱ्याचा धुरामुळे मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या एका वृद्ध शेतकऱ्याचा बळी गेला आहे. या आंदोलनाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी फेकलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्या या वृद्ध शेतकऱ्याच्या जिवावर बेतल्या आहेत.

ज्ञान सिंह असं या वृद्ध शेतकऱ्याचं नाव असून ते गुरदासपूर येथील रहिवासी होते. 70 वर्षांचे ज्ञान सिंह 11 फेब्रुवारी रोजी आपल्या गावातून शंभू सीमेसाठी रवाना झाले. पण हरयाणा सीमेवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे त्या धुराने त्यांची प्रकृती बिघडली.

त्यांना तेथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांची प्राणज्योत मालवली. ज्ञान सिंह यांचं कुटुंब अत्यंत गरिबीत राहतं. त्यांच्याकडे जमिनीचा एका छोटा तुकडा असून त्यावरच त्यांची गुजराण होते. 2020 मधील दिल्ली येथे झालेल्या शेतकरी आंदोलनातही ते सक्रियरित्या सहभागी होते. त्यांच्या कुटुंबात त्यांचा भाऊ राहतो. त्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.