ऑनलाइन शिक्षणावर हॅकर्सचे आक्रमण मजेसाठी सायबर बुलिंगचे प्रकार वाढले

मंगेश सौंदाळकर  । मुंबई

ऑनलाईन शिक्षणात हॅकर्सच्या सायबर बुलिंगने हैदोस मांडल्याने पालक आणि शिक्षकाच्या डोक्याला ताप झाला आहे. मजेसाठी कधी शिक्षकांना शिवीगाळ करणे तर कधी मुलासमोर नकोसे कृत्य करण्याचे प्रकार हॅकर्स करत आहेत. त्याबाबच्या तक्रारी महाराष्ट्र सायबरकडे येत आहेत.

कोरोनामुळे राज्यात शाळा -महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांना घरी बसून लॅपटॉप किंवा स्मार्ट फोनवरून ऑनलाईन शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे. तासन तास मुलाना स्मार्ट फोन किंवा लॅपटॉप समोर बसून राहावे लागते. त्याना खेळायला मिळत नसल्याने मुले चिडचिडी होत आहेत. असे असतानाच हॅकर्स हे स्वतःच्या मजेसाठी सायबर बुलिंग करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. ऑनलाईन अभ्यास सुरु असतानाच हॅकर्स शिक्षकांना शिवीगाळ करतात. तसेच काही सेकंदांचे पॉर्न व्हिडीओ अपलोड करून क्षणिक आनंद घेतात. शाळेची बदनामी होईल या भीतीपोटी शिक्षक तक्रार करण्यास पुढे येत नाही.

नुकतेच महाराष्ट्र सायबरने राज्यातील मुख्याध्यापकाचे वेबिनार आयोजित केले होते. त्या हा मुद्दा समोर आला आहे. अशा घटना घडूच नये यासाठी म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे काम महाराष्ट्र सायबर करत आहेत. पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी घेतलेल्या ऍप्स बाबत माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन क्लासेस दरम्यान नकोसे कृत्य करणाऱया हॅकर्सकर लक्ष असल्याचे महाराष्ट्र सायबरचे अधीक्षक बालसिंग राजपूत यांनी सांगितले. असे कृत्य कोणी करत असल्यास त्याची तक्रार जवळील पोलीस ठाण्यास करण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.

मुलांनो लिंक शेअर करू नका

ऑनलाईन क्लासेसला कंटाळले विद्यार्थी हे क्लासेसची लिंक अन्य व्यक्तींना शेअर करतात. ती लिंक शेअर होताच अन्य व्यक्ती जेक्हा एखादी विद्यार्थिनी एकटी दिसल्यास तिला अश्लील कमेंट करणे, पॉर्न व्हिडीओ पाठवण्याचे तर कधी शिक्षकांना शिवीगाळ करून पळून जाण्याचे प्रकार होतात.

आपला मुलगा काय करतो, तो कोणाशी बोलत असतो. अभ्यास झाल्याकर किती वेळ ऑनलाईन असतो याकडे पालकांनी लक्ष द्यावे. पालकांना देखील इंटरनेटचे ज्ञान असावे. जेणेकरून पाल्य नेमके कोणत्या संकेतस्थळाकर जाऊन काय करतो हे त्यांना माहिती पडेल. डॉ. राकेश क्रिपलानी, सायबर मानसोपचार तज्ञ

आपली प्रतिक्रिया द्या