हनुमान चालिसा पठण प्रकरण- राणा दांपत्याविरोधात सत्र न्यायालयाचे वॉरंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयाने गुरुवारी हनुमान चालिसा पठण प्रकरणात अटक वॉरंट जारी केले. मागील सुनावणी वेळी सक्त आदेश दिल्यानंतरही दोघांनी गुरुवारी न्यायालयात दांडी मारली. त्यामुळे न्यायालयाने गंभीर भूमिका घेत राणा दांपत्याला अटक वॉरंटचा झटका दिला आहे. नवनीत यांच्यावर आधीच बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अटकेची टांगती तलवार आहे. त्यातच या नव्या वॉरंटमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

एप्रिलमध्ये राणा दांपत्याने शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट धरला होता. त्या वेळी सामाजिक अशांतता आणि धार्मिक सौहार्द बिघडवल्या प्रकरणी राणा दांपत्याला खार पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी सध्या सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 11 नोव्हेंबरला झालेल्या सुनावणी वेळी सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दांपत्याला न्यायालयात हजर राहण्याचा सक्त आदेश दिला होता. त्या आदेशाला अनुसरून दोघांनी गुरुवारी न्यायालयात हजर राहणे बंधनकारक होते. मात्र दांपत्य पुन्हा गैरहजर राहिल्याचे निदर्शनास येताच न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दोघांविरुद्ध 5 हजारांचे जामीनपात्र अटक वॉरंट बजावले आणि सुनावणी 14 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली. यापुढील सुनावणीला राणा दांपत्य हजर न राहिल्यास दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे. नवनीत राणा व त्यांच्या वडिलांविरुद्ध आधीच बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अटकेची टांगती तलवार आहे. त्यातच आता हनुमान चालिसा पठण प्रकरणात अटक वॉरंट जारी झाल्यामुळे नवनीत राणा यांची चिंता वाढली आहे.

नेमके प्रकरण काय…

राज्यात मशिदींवरील भोंग्यांचे प्रकरण तापले होते. त्याच वेळी राणा दांपत्याने ‘मातोश्री’ परिसरात हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राणा दांपत्य ताळ्यावर आले होते. मात्र सामाजिक वातावरण कलुषित केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. ही कोठडी संपल्यानंतर राणा दांपत्याची काही अटींसह जामिनावर सुटका झाली होती.