हार्दिक पंड्याने रोहित शर्माला शिवीगाळ केली? व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु असून इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासाठी हार्दिक पांड्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. दरम्यान ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की हार्दिक पंड्याने दुसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माला शिवीगाळ केली होती. यामुळे हार्दिक विरोधात नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मैदानावरील त्याच्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतो. असाच काहीसा प्रकार इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात घडला, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पांड्याने कर्णधार रोहित शर्माला शिवीगाळ केल्याचा दावा केला जात आहे.

हार्दिकचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. दरम्यान अनेक युजर्सनी त्याच्यावर टीका केली आहे. हार्दिकच्या मैदानावरील वागणुकीबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये हार्दिकचा केवळ आवाज येत आहे. मात्र शिवीगाळ करताना तो स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे दावा करण्यात येत असलेला व्हिडीओ खरा असल्याची पुष्टी करता येत नाही.

Photo – टी-20 मधील हिंदुस्थानचे 5 शतकवीर, ‘हिटमॅन’ने केलाय चारदा असा कारनामा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पांड्याचा आवाज डीआरएस घेण्याच्या चर्चेदरम्यान असल्याचा दावा ट्विटरवर केला जात आहे. त्याचवेळी पांड्याने रोहितशी बोलताना अपशब्द वापरले. मात्र, त्याने ही शिवीगाळ नक्की कोणाला केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. हार्दिकचा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. या सामन्यात त्याची बॅट काही खास चालली नाही. गोलंदाजीत त्याने तीन षटकात 29 धावा देऊन एक विकेट घेतली.