मुश्रीफांवर ईडीची धाड; दिल्लीकरांनी शब्द पाळला! व्हायरल व्हिडीओमुळे सोमय्या अडचणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) होत असलेल्या कारवाया या दिल्लीश्वरांच्या आदेशावरून होत आहेत हे सर्वश्रुत आहे, पण त्याचा ठोस पुरावाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी जगासमोर आणला आहे. मुश्रीफ यांच्यावरही ईडीची छापेमारी झाली. त्याचे आदेश दिल्लीतून म्हणजेच केंद्र सरकारमधून आले होते. याची कबुली भाजपचेच नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. त्याचा व्हिडीओ मुश्रीफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर खळबळ उडाली आहे.

हसन मुश्रीफ यांच्यावर झालेली ईडीची छापेमारी हे एक मोठे षड्यंत्र होते. सोमय्या यांनी दिलेली कबुली ही त्याचा धडधडीत पुरावाच असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ईडीच्या छापेमारीनंतर गेल्या पाच दिवसांपासून मुश्रीफ आणि सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. मुश्रीफ यांनी आपल्यावरील आरोप फेटाळतानाच सोमय्या यांचा 33 सेकंदांचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केला आहे.

मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर 11 जानेवारीला ईडीने छापा घातला. ईडीकडून चौकशी सुरू असतानाच एका टीव्ही वाहिनीच्या अँकरने किरीट सोमय्या यांना फोन करून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोमय्या हे दुसऱ्या एका व्यक्तीशी दुसऱ्या फोन वरून बोलत होते. त्यांनी अँकरचा फोन रीसिव्ह केला असल्याने त्यांचे बोलणे टीव्हीवर ऐकू येत होते. सोमय्या हे पलीकडच्या व्यक्तीला ‘हसन मुश्रीफच्या घरावर रेड सुरू झाली आहे, दिल्लीवाल्यांनी कमिटमेंट पूर्ण केली’ असे सांगत होते.

मुश्रीफ समर्थक आक्रमक; सोमय्यांचा कोल्हापूर दौरा अनिश्चित
सोमय्या यांचा हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर मुश्रीफ समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यातच सोमय्या हे सोमवारी कोल्हापूर दौऱयावर जाणार आहेत. कोल्हापुरात त्यांना मुश्रीफ समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे त्यांच्या दौऱयाबाबत अनिश्चितता बनली आहे.