
सामना ऑनलाईन । कोलकाता
क्रिकेटर मोहम्मद शमीवर फसवणूक, बलात्कार व हत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करणारी त्याची पत्नी हसीन जहाँने पुन्हा मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलं आहे. शमीपासून विभक्त झाल्यानंतर हसीन जहाँला सन्मानाने जगायचं आहे. तीन वर्षाच्या मुलीची जबाबदारीही तिच्यावर आहे. यामुळे आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी चार वर्षांनंतर पुन्हा मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करत असल्याचं तिने सांगितलं आहे.

चार महिन्याआधी हसीनने शमीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यात तिने शमीवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. शमीचे अनेक तरुणींशी विवाहबाह्य संबंध असून त्याचा मॅच फिक्सिंगमध्येही सहभाग असल्याचा आरोप तिने केला होता. तसेच शमीने त्याच्या भावाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आपल्यावर जबरदस्ती केली आपली हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. असा आरोप तिने शमीवर केला होता. शमीने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. बीसीसीआयनेही शमीला क्लीन चीट दिली होती. त्यानंतर हसीनने शमीने दरमहा १० लाख रुपये पोटगी द्यावी अशी मागणी न्यायालयात केली होती. हा खटला न्यायालयात सुरू असून यावर अद्याप सुनावणी बाकी आहे. यामुळे हसीनला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या दरम्यान, तिने शमीकडे परत जाण्याचाही प्रयत्न केला. पण शमीने तिच्याकडे दुर्लक्ष केले व न्यायालयातच भेटूया असा निरोप पाठवला. यामुळे हसीनने अर्थाजनाबरोबर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी पुन्हा मॉडेलिंगच्या दुनियेत पदार्पण केले आहे. यासाठी तिने जिममध्ये जाण्यास सुरुवात केली असून १५ किलो वजन कमी केले आहे. आपल्या या नव्या लूकचे फोटो ती सोशल साईटवर पोस्ट करत आहे.

हसीन मॉडेल होती आणि कोलकाता नाइट रायडर्ससाठी तिने चीअर लीडरचे काम केले होते. त्याचवेळी तिची ओळख शमीबरोबर झाली होती. शमीबरोबर २०१४ साली लग्न झाल्यानंतर तिने काम करणे बंद केले होते. हसीनचे हे दुसरे लग्न असून तिला पहिल्या पतीपासून दोन मुली व शमीपासून एक मुलगी आहे. सध्या ती कोलकाता येथे मुलगी बेबो ब वडिलांबरोबर राहते. पण तिला पुन्हा मॉडेलिंगबरोबर बॉलिवूडचे वेध लागले आहेत. यासाठी ती मुंबईत स्थायिक होण्याच्या विचारात आहे. गेल्याच आठवड्यात तिने ‘स्क्रिप्ट’ या गूढपटात काम केले.


























































