
गाणी ऐकण्याची आवड आपल्या सर्वांनाच असते. पण, ती गाणी बसवून ती ध्वनिमुद्रित करणं ही एक मोठी प्रकिया असते. त्यात गायकाचा खूप मोठा वाटा असतो. हीच गाणी जेव्हा एखाद्या जाहीर कार्यक्रमात बसवली जातात, तेव्हा गायकांना हेडफोन्सची मदत होते.
रेकॉर्डिंगच्या वेळी गाणं गाताना किंवा जाहीर कार्यक्रमात गायक बऱ्याचदा हेडफोन्स घालतात. हे हेडफोन्स नेमके का घालतात, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. याच प्रश्नाचं उत्तर कोरा या प्रश्नोत्तराच्या संकेतस्थळावर देण्यात आलं आहे.
तांत्रिक भाषेत ह्याला मॉनिटरिंग असं म्हणतात. म्हणजे स्टेजवरील आवाज ऐकू येईल अशी व्यवस्था.तुम्ही जेव्हा संगीत सादरीकरणाचा आस्वाद घेत असता, तेव्हा तो आवाज तुम्हाला पीए, अथवा पब्लिक अड्रेस सिस्टम वरून येतो. ज्याचं प्रक्षेपण हे श्रोत्यांच्या दिशेने असतं. पण वाद्य तर स्टेजवर वाजत असतात, मग कलाकारांचं काय? त्यांना कसं ऐकू येतं? जेव्हा तुम्ही स्टेजवर सादरीकरण करता, मुख्यत्वेकरून करून संगीत, तेव्हा तुम्हाला स्वतः बरोबरच सोबतीच्या मंडळींच्या वाद्यांचा, गायनाचा आवाज येणं फार गरजेचं असतं. जेणेकरून सर्वांचा ताळमेळ कायम राहील आणि संगीत योग्य ताल आणि लयीत सादर होईल. प्रत्येक वाद्य, आवाजाचा स्तर हा उपस्थित कलाकारांसाठी वेगवेगळा असू शकतो. याच साठी हेडफोन्स, इन-इयर मॉनिटर्सचा वापर केला जातो. बरेचदा तुम्ही स्टेजवर कलाकारांच्या बाजूला तोंड केलेले स्पीकर्स ठेवलेले दिसतील, त्यांचं सुद्धा हेच प्रयोजन असतं. त्यांना ऑन स्टेज मॉनिटर्स म्हणतात.
बहुतेक मोठे/व्यावसायिक कलाकार स्वतःचे इन इअर मॉनिटर्स जवळ बाळगतात जे खास करून त्यांच्या कानाच्या आकाराप्रमाणे बनवलेले असतात.
मॉनिटरिंग जेवढं उत्तम, तेव्हढं सादरीकरण उत्तम होऊ शकतं. स्टेजपासून दूर बसलेला परंतु आवाजाची सर्व धुरा सांभाळणाऱ्या ऑडिओ इंजिनीअरकडे या सगळ्याची सूत्रं असतात, आणि तो कलाकारांशी मॉनिटर्स मार्फत संवाद साधू शकतो.




























































