जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टी; खरीप पिकांचे नुकसान

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतशिवारात पावसाचे पाणी साचल्याने ऊसासह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गोदावरीसह अनेक लहान-मोठ्या नद्या,नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. या पूरात अनेक पिके आडवी झाली आहेत.

जालना जिल्ह्यात आठवड्याभरापासून दररोज मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतशिवारात सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे. तालुक्यातील तीर्थपुरी, मुद्रेगाव, मंगरूळ, भोगगाव, सौंदलगाव, बानेगाव, मुरमा, रामसगाव, जोगलादेवी या गोदाकाठच्या गावातील नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. सततच्या पावसाने काही ठिकाणी घरांची पडझड झाली असून अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीनचे पीक हातातून जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अतिवृष्टीने तालुक्यातील 90 टक्के उभा ऊस आडवा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. प्रशासनाने तात्काळ पिकांचे पंचनामे करावे, अशी मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या