
पावसाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह कोकणात जोरदार हजेरी लावली आहे. पाऊस थांबण्याचे अजिबात नाव घेत नसल्यामुळे सांगली, सातारा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरात राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून पंचगंगेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. कोकणातही रत्नागिरी, सिंधूदूर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आजही सर्वत्र पावसाची संततधार सुरूच राहिली. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत दिवसभरात एका फुटाने वाढ झाली आहे. सायंकाळी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले. त्यातील विसर्गामुळे पंचगंगेची पाणीपातळी पुन्हा वाढणार आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 64.5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून, 19 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सकाळी 7 वाजता पंचगंगेची 28 फूट असलेल्या पाणीपातळीत संध्याकाळी 9 इंचांची वाढ झाली होती.
हवामान विभागाने राज्यात पाच दिवसांत ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश असून जिल्ह्यात त्याचा परिणाम दिसून येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू होती. कालपासून तर संततधार पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. आज दुपारी दीडपर्यंत हातकणंगले- 4.4, शिरोळ-2.7, पन्हाळा-14.2, शाहूवाडी-49, राधानगरी-35.3, गगनबावडा-64.5, करवीर-9.3, कागल-8.4, गडहिंग्लज-10, भुदरगड-10.8 आजरा-15.6 आणि चंदगड तालुक्यात 26.1 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
निळवंडे धरण भरले; मुळा भरण्याच्या मार्गावर
पाणलोटात सुरू असलेल्या तुफान पावसामुळे भंडारदरा धरण काल ओव्हर फ्लो झाले होते. त्यापाठोपाठ जिल्ह्यातील तिसरे महत्त्वाचे असलेले निळवंडे धरणही सोमवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरल्याचे जलसंपदा विभगाकडून जाहीर करण्यात आले. निळवंडे धरणातून सुरू असलेल्या दहा हजार 856 क्युसेकच्या विसर्गामुळे यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच प्रवरा नदीला पूर आला आहे, तर भंडारदरा धरणातूनही नऊ हजार 892 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कोतुळकडून मुळा धरणात सुरू असलेली पाण्याची आवक टिकून राहिल्यास गणेश विसर्जनापूर्वीच हे धरणही तांत्रिकदृष्टय़ा भरण्याची शक्यता आहे.
जामखेडमधील खैरी मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो
जामखेड तालुक्यातील सर्वांत मोठा खैरी मध्यम प्रकल्प सोमवारी (दि. 13) दुपारी चार वाजता पूर्ण क्षमतेने भरला असून, तालुक्यातील अन्य सात लघू पाटबंधारे तलाव यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरले आहेत. 100.49 दशलक्ष घनफूट क्षमता असलेला पिंपळगाव आळवा लघू पाटबंधारे तलाव 40 टक्के भरला असून, 48.77 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे, तर 87.94 दशलक्ष घनफूट क्षमता असलेला धोंडपारगाव लघु पाटबंधारे तलावात केवळ नऊ टक्के पाणीसाठा आहे. अमृतलिंग लघु पाटबंधारे तलाव आणि जवळके लघू पाटबंधारे तलाव आजही कोरडाच आहे.
गोदावरी नदीला पूर
सलग तिसऱया दिवशी जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी सुरू होती. गंगापूर धरणामधून दुपारी 4009 क्यूसेक्सने पाणी सोडल्याने, तसेच होळकर पूलाखालून 7830 क्यूसेक्स असा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदाघाटावरील मंदिरे पाण्याखाली गेली असून, दुतोंडय़ा मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहचले आहे. गंगापूर, दारणासह सात धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांना जोरदार पावसाने झोडपले आहे. अंबोली, गंगापूर, त्र्यंबकेश्वर परिसरातील पावसामुळे गंगापूर धरणातील साठा 98 टक्क्यांवर पोहचला आहे.
कोयना धरणाचा विसर्ग 50 हजार क्युसेकवर
पाणलोट क्षेत्रात पडत असलेला मुसळधार पाऊस आणि कोयना धरणात 39 हजार 318 क्युसेकने येणारी नवीन आवक लक्षात घेता धरणाचे सहा वक्री दरवाजे सोमवारी सायंकाळी नऊ फुटांनी व उचलण्यात आले असून, त्यातून 47 हजार 900, तर पायथा वीजगृहातून 2100 असा 50 हजार क्युसेकचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे 11 फूट पाणीपातळी असलेल्या आयर्विन पुलाची पाणी पातळी मंगळवारी 25 फुटांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
































































