हिजाब विरुद्ध भगवी शाल वाद – कोर्टाने मागवली कुराणाची प्रत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटक सरकारने लागू केलेल्या ड्रेसकोडमुळे येथील सरकारी महाविद्यालयांत हिजाब विरुद्ध भगवी शाल असा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी न्यायालयाने भावनेने नाही तर कायद्याने निर्णय घेणार असे म्हटले.

उडुपी येथील सरकारी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजच्या 6 विद्यार्थिनींनी हिजाब बंदीबाबत कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज उच्च न्यायालय सुनावणी करणार पार पडली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्यासमोर ही सुनावणी आज झाली. या दरम्यान याचिकाकर्त्यांनी या प्रकरणी आणखी एक याचिका दाखल करण्यात आल्याने आजची सुनावणी स्थगित करण्याची मागणी केली. तसेच सर्व कागदपत्र आलेले नाही, त्यामुळे सुनावणी सुरू करू नका असे याचिकाकर्त्यांनी म्हटले. मात्र आज जी सुनावणी होईल ती अन्य प्रकरणांनाही लागू असेल असे न्यायालयाने म्हटले.

कुराणची प्रत मागवली

सुनावणीवेळी न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की येथे भावनेने नाही तर कायद्याने निर्णय होईल. या सुनावणीसाठी न्यायालयाने मुसलमानांचा प्रवित्र ग्रंथ कुराणची एक प्रतही मागवली असून त्याआधारे सुनावणी सुरू केली. कुराणमध्ये हिजाब आवश्यक आहे का? असे कुठे म्हटले आहे का असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. यावर उत्तर देताना याचिकाकर्त्यांनी कुराणमधील आयात 24.31 आणि 24.33 मध्ये ‘हेड स्कॉफ’चा उल्लेख असल्याचे सांगितले. ते किती आवश्यक आहे देखील यात सांगितल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले.

हिजाब विरुद्ध भगवी शाल वाद; कर्नाटकात दोन महाविद्यालये बंद

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोणत्याही गोष्टीचा विचार करताना धार्मिक आधारही पाहायला हवेत असे म्हटले. यावेळी त्यांनी केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाचाही हवाला दिला. चेहरा न लपवणे आणि लांब ड्रेस न घालणे शिक्षेस पात्र असल्याचे म्हटले. ‘हदीथ’चा हवाला देत त्यांनी ही बाब न्यायालयात सांगितली. ‘हदीथ’चा अर्थ चेहरा दाखवणे असा होतो का असा प्रश्न न्यायमूर्तीनी विचारला होता त्याला उत्तर देताना याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी हे उत्तर दिले. तसेच केरळ प्रकरणाचा हवाला देत याचिकाकर्त्यांच्या वकिलाने डोके न झाकणे ‘हराम’ असल्याचेही म्हटले.

महाविद्यालय बंद

महाविद्यालय प्रशासनाने सरकारने लागू केलेल्या ड्रेसकोडचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. मात्र असे असतानाही विद्यार्थी हिजाब व भगवी शाल परिधान करून वर्गात येत आहेत. विजयपुरा येथील शांतेश्वर महाविद्यालयातील काही विद्यार्थी भगवी शाल घालून आल्याने वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सुट्टी जाहीर करत कॉलेज कॅम्पसच बंद करण्यात आला. तर कलवारा वरदराज एम शेट्टी शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश बंद करण्यात आला.