
सामना प्रतिनिधी । मुंबई
पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलासा दिला. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायमूर्ती साधना जाधव यांनी धनंजय देसाई यांना जामीन अर्ज मंजूर केला.
पुण्यातील मोहसीन शेख याने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे 2014 साली दोन गटांत मारामारी झाली होती. या प्रकरणी हडपसर येथे 2 जून 2014 साली आयटी क्षेत्रातील मोहसीनची हत्या करण्यात आली. पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांच्यासह 23 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी आपल्याला जामीन मिळावा यासाठी देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात ऍड. अभिजीत देसाई यांच्या वतीने जामीन अर्ज केला. न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर झालेल्या सुनावणी वेळी 50 हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांची सुटका केली.
























































