
पोलीस व अन्य महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेणाऱ्या मिंधे सरकारने आता माणसाच्या जिवाशी संबंध असलेले डॉक्टर्सही कंत्राटावर घेण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रुग्णालयांमध्ये हे कंत्राटी डॉक्टर्स तैनात करण्यात येणार आहेत.
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महाराष्ट्र क्षेत्रातील प्रादेशिक मंडळाची 114 वी बैठक आज मंत्रालयातील परिषद कक्षात कामगारमंत्री तथा ईएसआयसी राज्य अध्यक्ष डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामध्ये त्यांनी वरील निर्देश दिले.
राज्यातील कर्मचारी राज्य विमा महामंडळाची रुग्णालये (ईएसआयसी) सुरळीतपणे चालवता यावीत यासाठी ती कामगार विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावीत, असे निर्देशही डॉ. खाडे यांनी आज दिले. ईएसआयसी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची 156 पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी एमपीएससीला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. परंतु तोपर्यंत तिथे कंत्राटी स्वरूपात डॉक्टर्स भरले जावेत, असे निर्देश कामगारमंत्र्यांनी दिले.
राज्यात असलेली ईएसआयसी रुग्णालये सुपर स्पेशालिटी रुग्णालयांसारखी असावीत, त्यांना जिह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न करावे, असेही खाडे म्हणाले. या बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, ईएसआयसीचे विभागीय संचालक तथा सदस्य सचिव अनिल साहू, सदस्य संगीता जैन, रवींद्र झिमटे, वैद्यकीय आयुक्त डॉ. सी. सी. खाका, विमा आयुक्त तसेच सर्व वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.


























































