कोरोना नियमावली पाळून मुंबईत होळी, धुळवड साजरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने होळी आणि धूलिवंदन सार्वजनिकरीत्या साजरे करू नये अशा राज्य सरकारच्या आवाहनाला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेले सर्व नियम पाळून नागरिकांनी साध्या पध्दतीने होळी आणि धूलिवंदनाचा सण साजरा केला.

मुंबईतील इमारती आणि सोसायटय़ांच्या आवारात निवडक रहिवाशांच्या उपस्थितीत होलिकादहन केले गेले. होळीला श्रीफळ आणि पुरणपोळीचा नैवैद्य अर्पण करण्याच्या परंपरेचे पालन करताना मास्क आणि सोशल डिस्टिन्सिंगचे भान नागरिकांनी ठेवले होते. अनेक मंडळांनी होळीच्या निमित्ताने कोरोनापासून सावध राहण्यासाठी जनजागृती केली. धुळकडीचा सण नैसर्गिक रंगांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने साजरा केला गेला. फुगे मारण्यावर बंदी असल्याने त्याचे पालन सर्वांनी केल्याचे यंदा दिसून आले. सुट्टीचा दिवस आणि गर्दीची शक्यता याचा विचार करून बहुतांश हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट्स बंद होते. बहुतांश मुंबईकरांनी कुटुंबासोबत घरीच धुळवडीचा आनंद घेतला.

कोरोना नियमावलीचे पालन न करता अनावश्यक रस्त्यावर फिरणाऱया टोळक्यांना आवरण्यासाठी नाक्यानाक्यांवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेकला होता. चौपाटय़ांवरही पोलीस तैनात होते. काही ठिकाणी मोटरसायकलींवरून विनाकारण फिरणाऱया तरुणांना पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला. सोसायटय़ांमध्ये डीजे लावून धिंगाणे घालण्याचा प्रयत्न करणाऱयांना यावेळी पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागला.