होलीकेची अनोखी प्रेमकहाणी…वाचा सविस्तर…

होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येतो. वाईटावर चांगल्याचा विजय असल्याचा संदेश या सणातून देण्यात येतो. होळी म्हणली की, होलीका, तिचा भाऊ दैत्यराज हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद यांची कथा आठवते. आपला भाऊ दैत्यराज हिरण्याकश्यपच्या दबावामुळे होलीकेने भक्त प्रल्हादसह आगीत प्रवेश केल्याची कथा सांगण्यात येते. मात्र, हिमाचल प्रदेशात होलीकेची अनेकांना अज्ञात असलेली प्रेमकहाणी रुढ आहे. ती आपल्या प्रेमासाठीच भक्त प्रल्हादसह आगीत प्रवेश करण्यास सिद्ध झाली होती, अशी मान्यता आहे. या ठिकाणी प्रेमाच्या त्यागासाठी होलीकेचे स्मरण केले जाते.

दैत्यराज हिरण्यकश्यपची होलीका बहीण होती. तिला आगीपासून कोणेतही नुकसान होणार नाही असा वर मिळाला होता. भक्त प्रल्हादच्या विष्णूभक्तीमुळे संतप्त झालेल्या हिरण्यकश्यपने होलीकेला प्रल्हादसह आगीत प्रवेश करण्याची आज्ञा दिली होती. होलीकेचे प्रल्हादवर प्रेम असल्याने तिने असे करण्यास नकार दिला होता. अखेर भावाच्या दबावापुढे तिला झुकावे लागले. तिने प्रल्हादसह आगीत प्रवेश केला आणि अघटित घडले. आगीने भक्त प्रल्हादचे रक्षण करून होलीकेलाच भस्मसात केले. तेव्हापासून हा सण साजरा करण्यात येतो, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. देशभरात सांगण्यात येणाऱ्या या कथेपेक्षा वेगळी कथा हिमाचल प्रदेशात रुढ आहे. त्यात होलीकेला प्रेमाच्या त्यागाचे प्रतीक मानले आहे. होलिकेचे शेजारील राज्यातील इलोजीवर प्रेम होते. त्यांचा विवाहही ठरला होता. या प्रेमासाठीच तिने बलिदान दिल्याची कथा सांगण्यात येते.

इलोजीला कामदेवाचे प्रतिरुप मानण्यात येते. त्या काळात प्रेमासाठी होलीका आणि इलोजीच्या आणाभाका घेण्यात येत होत्या. मात्र, त्यांची ही प्रेमकहाणी अधुरीच राहिली. प्रल्हादच्या विष्णुभक्तीमुळे हिरण्यकश्यप संतप्त झाला होता. प्रल्हादला मारण्यासाठी त्याने अनेकदा प्रयत्न केले. मात्र, त्याला त्यात यश आले नाही. होलीकेला आगीपासून संरक्षणाचा वर असल्याने प्रल्हादला घेऊन आगीत प्रवेश करण्याची आज्ञा त्याने होलीकेला दिली. त्यामुळे प्रल्हाद, त्याची विष्णुभक्ती संपेल, माझे अधिकाज्य तिन्ही लोकांमध्ये स्थापन होईल आणि तूही सुरक्षित राहशील, असे त्याने होलीकेला सांगितले. भाचा प्रल्हाद तिचा आवडता असल्याने तिने याला नकार दिला. तिच्या नकाराने हिरण्यकश्यपच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तू माझे काम केले नाही तर तुझा विवाह इलोजीशी होऊ देणार नाही, असे हिरण्यकश्यपने होलीकेला धमकावले.

आपले प्रेम आणि भाचा प्रल्हाद यांच्यापेकी एकाची निवड करण्याचे धर्मसंकट होलीकेसमोर उभे ठाकले. अखेर तिने प्रेमासाठी भावाची आज्ञा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या तिथीला तिने प्रल्हादासह आगीत प्रवेश केला. तसेच या संकटातून प्रल्हादचे रक्षण करण्याची विनंती तिने अग्निदेवतेला केली. तिच्या विनंतीमुळे प्रल्हाद या आगीतून बचावला. मात्र, होलीकाच आगीत भस्मसात झाली. प्रेमासाठी होलीकेचे स्वतःचे बलीदान दिले आणि प्रल्हादलाही वाचवले. तिची प्रेमकहाणी अधुरी राहिली असली तरी तिची प्रेमकथा अमर झाली आहे. ज्या तिथीला होलीका प्रल्हादसह आगीत प्रवेश करते, त्याच तिथीला तिचा विवाह इलोजीशी निश्चित करण्यात आला होता. घडलेल्या घटनेबाबत इलोजीला अनभिज्ञ असतो. तो वरातीसह राजमहालात प्रवेश करतो. त्याला घटनेबाबत समजल्यावर त्याला धक्का बसतो. होलीकेने ज्या ठिकाणी आगीत प्रवेश केला असतो, त्या ठिकाणी तो निपचीत पडून राहतो. त्यानंतर आयुष्यभर तो होलीकेला शोधत फिरतो. त्या दोघांच्या प्रेमामुळेच ही कथा अमर झाली आहे. आजही हिमाचल प्रदेशात प्रेमासाठी होलीका आणि इमेजीचे सन्मानाने स्मरण केले जाते. लग्नविधामध्येही त्यांना स्थान देण्यात आले आहे. आजही या प्रथेतून आणि प्रेमाच्या रुपात होलीका आणि इमोजी अस्तित्वात आहेत, अशी मान्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या