नैराश्य दूर करण्यासाठी असा होतो कुंडलीचा फायदा

412

anupriya-desai-astrologer>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद)

रोजची आव्हाने हाताळण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे कारण प्रत्येकाची मानसिक पातळी,समज वेगळी आहे. स्वतःला वेळीच ओळखून तुम्ही ह्या मानसिक तणावाला कसे हाताळायचे हे कुंडलीच्या माध्यमातून वेळीच समजून घ्या…

शनिवारी कुंडली विवेचनासाठी परागची आई (नाव बदलेले आहे ) आणि बाबा आले होते. परागची कुंडली कशी आहे? काही दोष तर नाही ना? हा त्यांचा प्रश्न. त्याची कुंडली अभ्यासतांना त्याचे शिक्षण आणि नोकरी ह्यांवर चर्चा सुरु होती. शिक्षणांत चांगली प्रगती साधलेली असुनही नोकरी मनासारखी नसल्याचे आईचे म्हणणे. पुढे येणारे कुंडलीतील काही योग नोकरीच्या दृष्टीने चांगले असल्यामुळे नोकरीत चांगला हुद्दा मिळू शकेल असे मी त्यांना सांगितले. परंतु त्यावर त्यांचे समाधान झाले नाही. अधिक चर्चा करता समजले की सध्या पराग नैराश्याच्या आहारी गेला आहे. शिक्षण असूनही कमी पगाराची नोकरी आणि त्यात नोकरीत वरिष्ठांचे राजकारण, ह्यांमुळे क्षमता असुनही कायम दुय्यम वागणूक मिळायची. दुसऱ्या नोकरीच्या शोधात कायम पराग असायचा. परंतु काही ना काही कारणांमुळे नवीन नोकरीचे योग जमून येत नव्हते. सततच्या ह्या परिस्थितीमुळे पराग गप्पगप्प राहू लागला. कौटुंबिक समारंभ,कार्यात परागची अनुपस्थिती राहू लागली. शनिवार आणि रविवारी सुद्धा ऑफिसचे काम घरून करू लागला. त्याचे social life पूर्णतः बंद झाले होते. आई -वडिलांना आता त्याच्या स्वभावातील फरक जाणवू लागला होता. कुंडलीत काही दोष असावेत … आणि त्याचा काही परिहार मिळतो का ह्यासाठी त्यांनी माझी भेट घेतली होती.

कुंडलीचा अभ्यास करता – परागची कर्क राशीची कुंडली. कर्क राशीच्या व्यक्ति मुळातच हळव्या आणि संवेदनशील मनाची असतात. त्यातच चंद्राची शनि बरोबर होत असलेल्या युतिमुळे आधीच हळवा असलेला पराग हळूहळू नैराश्याकडे वळला.

आधीच्या काही लेखांमध्येही मी चंद्राबद्दल उल्लेख केला होता. चंद्र म्हणजे आपले मन. तुमच्या मनाची स्थिती जाणून घ्यायची असल्यास, तुमचा स्वभाव जाणून घ्यायचा असल्यास कुंडलीतील चंद्राची स्थिती, चंद्र कुठल्या राशीत आहे? चंद्र कोणत्या ग्रहांबरोबर योग करीत आहे? चंद्रावर कुठल्या ग्रहाची दृष्टी आहे? हे अभ्यासून उत्तर मिळू शकते. चंद्र ज्या राशीत असतो तीच आपली राशी असते. मुळातच हळव्याअसलेल्या राशी म्हणजे कर्क आणि मीन. कर्क आणि मीन ह्या दोन राशींना स्वतःपेक्षा दुसऱ्या व्यक्तिंची काळजी अधिक वाटते. त्यामुळे निःस्वार्थीपणे दुसऱ्या व्यक्तिची काळजी घेणे,नवनवीन पदार्थ करून जेवू घालणे हा त्यांचा स्वभाव. परंतु ह्या कर्क आणि मीन व्यक्तिंना त्यांच्यावर केलेली टीका,त्यांच्याशी कोणी उद्धटपणे किंवा स्पष्टपणे बोलले तर सहन होत नाही. ह्या व्यक्तिंशी बोलतांना खूप सावधतेने बोलावे लागते. मीन आणि कर्क ह्यांचे मन हळवे असल्याने कोणी त्यांची केलेली मस्करीसुद्धा त्यांना त्रासदायक ठरू शकते.

त्यापाठोपाठ संवेदनशील राशी म्हणजे कन्या आणि वृश्चिक. कन्या राशीचा मुळातच स्वभाव संवेदनशील आहेच परंतु नकारात्मक विचारचक्र सतत सुरू असतात. आयुष्यात घडणाऱ्या किंवा घडून गेलेल्या सकारत्मक घटनेपेक्षा जे नाही मिळाले, का चांगले घडले नाही ह्यांवर त्यांचे concentration जास्त असते. त्यातच जर चंद्राबरोबर राहू किंवा शनि सारखा ग्रह असेल तर त्यांच्या ह्या नकारात्मक विचारांना अजूनच खतपाणी मिळते. कन्या राशीने कोणत्याही प्रकारची माहिती गूगलवर शोधू नये. माझ्याकडे कन्या राशीचे दोन जातक आहेत. एका जातकाने तीन वर्षांपूर्वी माझी भेट घेतली होती. त्याला मानेच्या मागे एक गाठ झाली होती. ही गाठ कॅन्सरचीच आहे हा त्याचा समाज झाला. तीन ते चार डॉक्टरांकडे तपासून घेतल्यानंतरही त्याची ही भीती काही मनातून जात नव्हती. त्यावेळेस त्याला कुंडलीच्या माध्यमातून व्यवस्थित समजावले, काही सकारत्मक गोष्टी सांगितल्या. पठ्ठ्याने मान हलवली. मला वाटले झाले त्याचे समाधान. तीन वर्ष तरी त्याचा काही फोन नव्हता. गेल्याच महिन्यात पुन्हा त्याचा फोन. पुन्हा तीच भीती. मुंबईतल्या सर्व नामांकित डॉक्टरांकडे धावपळ करून तपासणी करून घेतली. त्याचा हा प्रश्न – प्रश्न कुंडलीनेसुद्धा तपासून पाहिला. उत्तर नकारात्मक आले. म्हणजे कॅन्सर नाही. त्याला पुन्हा तेच परंतु वेगळ्या शब्दात समजावले. कुंडलीत असे काही योग नाहीत हे सांगितले. सध्या तरी त्याचे समाधान झालेले वाटतेय.

वृश्चिक राशी अत्यंत संवेदनशील असली तरी ते तसे दर्शवत नाहीत. वृश्चिक राशीच्या व्यक्तिंचा मूड सतत बदलत असतो. बोलण्यात स्पष्टवक्ते जरी वाटले तरी वृश्चिक आतल्या गाठीचे असतात. खूप वर्षांपुर्वीच्याही घटना,गोष्टी व्यवस्थित लक्षात असतात. परंतु ह्या नकारात्मक गोष्टी मनात साठवून ठेवल्यामुळेच त्यांना कालांतराने नैराश्य येण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेतच हे नकारात्मक विचार आपल्या स्मरणातून काढून टाकण्यास कार्यशील राहावे.

ह्या राशींबरोबरच इतर राशीही संवेदनशील आहेत.परंतु ह्या राशींची संवेदना व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. धनु राशीची व्यक्ति जे मनात असेल ते बोलून मोकळी होईल. समोरच्या व्यक्तिवर राग व्यक्त करून आपले विचार मांडेल. मकर राशीही वरकरणी शांत वाटत असली तरी मनात साचून राहिलेल्या नकारत्मक विचारांमुळे आणि सततच्या संघर्षामुळे नैराश्याकडे लगेच झुकणारी राशी.

वृषभ आणि मिथुन ह्यांनाही आयुष्यात इतरांसारखाच संघर्ष आहे परंतु फिरण्याची आवड, संगीत-नृत्याची आवड, मित्रंमंडळींबरोबर आपले मनोगत व्यक्त करण्याच्या स्वभावामुळे त्यांना नैराश्य येण्याची शक्यता कमी होते.

सिंह राशी नावाप्रमाणेच आहे. मुळातच दुसऱ्यांवर राज्य करण्याचा स्वभाव- Dominating Nature. परंतु घरी किंवा कार्यालयाच्या ठिकाणी त्यांच्या ह्या स्वभावाला खतपाणी मिळाले नाही किंवा त्यांच्यावरच जर कोणी Dominate करत असेल तर मात्र फार काळ सिंह आनंदी राहू शकत नाही. एकाच घरात जेंव्हा एकापेक्षा अधिक सिंह राहतात तेंव्हाही हीच परिस्थिती असते. कोण वरचढ ठरणार ह्यांत दोघांनाही मानसिक त्रास होतो.

रोखठोक बोलणे आणि स्पष्टवक्तेपणा ही मेषेची ओळख. जसा चटकन राग येतो तसा तो निवळतो देखील. एखाद्या गोष्टीचे वाईट वाटले तरी त्याचा परिहार शोधून काढण्यासाठी पाठपुरावा करतील त्यामुळेच त्यांना नैराश्य येण्याची शक्यता फार कमी.

तुळ राशीचे चिन्हच मुळी तराजू आहे. सर्व गोष्टी balance करण्यात तरबेज असलेल्या तुळेला Depression येते खरे परंतु अंगी सहनशक्ती आणि मनावर असलेला ताबा ह्यांमुळे मानसिक ताणावर लगेच विजय मिळवतात. ह्यांचाही मित्र -परिवार मोठा असतो. फिरण्याची आवड असल्याने मनावरचा ताण, ऑफिसचे टेन्शन झटकून टाकणे त्यांना जमते. कुठल्या गोष्टीला किती आणि कधी महत्त्व द्यावे हे जमल्यामुळे त्यांना मानसिक ताणातून बाहेर येण्यास मदत होते.

कुंभ राशी शनिची. एखाद्या कामात अपयश आल्यास कुंभ व्यक्ति लगेच निराश होतात. निःस्वार्थीपणे काम करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या बरोबरीच्या व्यक्तिंबरोबर ह्यांचा स्वभाव Match होत नाही. मग ऑफिसच्या राजकारणामुळे त्यांना नैराश्य येण्याची शक्यता असते. ह्यामुळे काहीवेळेस ते त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतात. कुंभ राशी ही बौद्धिक तत्वाची राशी असल्याने दुसऱ्या व्यक्तिने समजावण्यापेक्षा त्यांचे त्यांना समजणे गरजेचे असते. मगच ते ह्या नैराश्यातून बाहेर येऊ शकतात.

सध्याचे स्पर्धेचे युग, स्वतःला सिद्ध करण्याच्या चढाओढीत मनुष्य स्वतः आनंदी ठेवण्याचे विसरत चालला आहे. प्रत्येक व्यक्ति वेगळी त्याचे विश्व वेगळे आणि म्हणूनच त्याचे प्रश्न आणि त्रास हे इतरांपेक्षा वेगळे आहेत. हा त्रास, ही रोजची आव्हाने हाताळण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे कारण प्रत्येकाची मानसिक पातळी,समज वेगळी आहे. स्वतःला वेळीच ओळखून तुम्ही ह्या मानसिक तणावाला कसे हाताळायचे हे कुंडलीच्या माध्यमातून वेळीच समजून घ्या.

कसा वाटला हा लेख? प्रतिक्रिया जरूर कळवा – [email protected]

संपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)

आपली प्रतिक्रिया द्या