धक्कादायक… पतीकडून पत्नीची हत्या; दरोडेखोरांनी विवस्त्र करून मारल्याचा बनाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवऱ्याच्या अनैतिक संबंधांबाबत पत्नीला समजल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बीड तालुक्यातील रंजेगाव येथे घडली. पत्नीच्या खुनानंतर पतीने आपले हातपाय बांधून घरावर दरोडा पडल्याचा बनाव केला. पत्नीला विविस्त्र करत दरोडेखोरांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा बनाव त्याने रचला होता. मात्र, अवघ्या काही तासात पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.

बीड तालुक्यातील रंजेगाव येथील दिनेश उर्फ विश्वांभर पांडुरंग आबुज (35) याचा बारा वर्षापूर्वी ज्योती दिनेश आबुज (29) यांच्याशी विवाह झाला. यांना दोन आपत्येही आहेत. दिनेश शेती करतो. तर ज्योती गृहिणी आहे. दिनेशचे आई-वडील काही दिवसांपूर्वी चारधाम यात्रेसाठी गेले. घरात पती-पत्नी आणि दोन मुले असा परिवार होता.

दिनेशचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचे समजल्यानंतर पती पत्नीमध्ये शनिवारी रात्री वाद झाला. या वादामुळे संतापलेल्या दिनेशने मध्यरात्री ज्योतीचा गळा आवळून खून केला. ही घटना अंगलट येईल म्हणून दिनेशने स्वत:चे हातपाय बांधले. आणि आरडाओरड करण्यास सुरूवात केली. गावातील लोक आवाजाने धावत आले. आपल्या घरात पाच-सहा दरोडेखोर घुसले आहेत. दरोडा टाकला आहे. पत्नीवर अत्याचार करून तिचा खूनही केला आहे असा बनाव त्याने केला. या गंभीर घटनेची माहिती पहाटे पिंपळनेर पोलिसांना मिळाली.

पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव हे घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक मागवण्यात आले. पहाटे दरोडेखोरांनी घरात घुसून मारहाण करत पत्नीला विवस्त्र केले. आपल्याला बाहेर दरवाजाजवळ बांधून टाकले. आणि पत्नीवर अत्याचार करत तिचा खून केला, असे दिनेशने पोलिसांना सांगितले. मात्र, घटनास्थळी दरोडा पडल्याच्या कोणत्याही खुणा पोलिसांना दिसल्या नाहीत. ज्योतीच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच होते. त्यामुळे पोलिसांना दिनेशचा संशय आला. त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यातच मृत ज्योतीचा भाऊ केदार करांडे याने दिनेशवर संशय व्यक्त केला.

दिनेश आपल्या बहिणीला मानसिक आणि शारिरीक त्रास देत आहे. घरात चोर शिरले, पत्नीला मारून टाकले असा बनाव तो करत असल्याचा आरोप त्याने केला. पोलिसांनी दिनेशला ताब्यात घेत चौकशी केली असता अवघ्या काही तासातच या गुन्ह्याचा तपास लागला. आपणच आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिनेशने दिली. पोलिसांनी काही तासातच या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.