राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेला जेवढा निधी दिला त्याच्या तिप्पट निधी आपण दिला : पालकमंत्री केसरकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या कालावधीत जेवढा निधी सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेला दिला नाही त्याच्या तिप्पट निधी आपण या चार वर्षात जिल्हा परिषद् आणि नगरपरिषदांना दिला आहे. मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात निधी आल्याने जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे विरोधक विनाकारण बोंबा मारत आहेत. ज्या झाडाला आंबे लागतात त्यावरच दगड मारले जातात आणि सद्या ते काम विरोधक करत आहेत. केवळ टिका करणे म्हणजे विकास होत नाही याचेही विरोधकांनी भान ठेवावे, असा सल्लाही पालकमंत्री दिपक केसरकर यांनी खासदार नारायण राणे यांना पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.

जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न झाल्या नंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री दिपक केसरकर बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसैनिक आदि उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री दिपक केसरकर म्हणाले की, जिल्ह्यात निधी येत नाही, केवळ निधीची घोषणा केली जाते, असे विरोधक सांगत आहेत. मात्र त्यांना एवढं कळत नाही की, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत अंतर्गत होणाऱ्या विकास कामांना निधी कोणी दिला. जर आपण निधी आणला नसता तर विकास कामे कशी काय झाली. कशी काय सुरु आहेत? असा प्रश्न उपस्थित करत तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांच्या पाच वर्षाच्या कालावधीत जेवढा निधी आला नाही त्याच्या तिप्पट निधी आपण आणला आहे. यात नगरोत्थान अंतर्गत राणे पालकमंत्री असताना १३ कोटी ५३ लाख रूपये आले होते तर युती सरकारच्या काळात ७० कोटीचा निधी आला. जिल्हा परीषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये जनसुविधा अंतर्गत राणे पालकमंत्री असताना ५ कोटी ५० लाख तर आपल्या काळात १८ कोटी १९ लाख, नागरीसुविधा अंतर्गत राणे पालकमंत्री असताना ३ कोटी ७५ लाख तर आपल्या काळात ९ कोटी ५० लाख, लपा विभाग राणे पालकमंत्री असताना ४ कोटी २० लाख तर आपल्या काळात २१ कोटी, कोल्हापुर टाइप बंधारे राणे पालकमंत्री असताना २ कोटी तर आपल्या काळात ८ कोटी, ग्रामीण रस्ते राणे पालकमंत्री असताना १९ कोटी तर आपल्या काळात ३५ कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे आणि हा सर्व निधी जिल्हा परिषद मार्फत खर्च केला जात आहे, असे असतानाही केवळ विरोधासाठी विरोधक टिका करीत आहेत, असेही पालकमंत्री दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

ज्या प्रमाणे एखाद्या झाडाला आंबे लागले की त्याच झाडावर दगड मारले जातात तसेच आपण विकास करत असल्याने विरोधक आपल्यावर टिका करत आहेत असे सांगतानाच केवळ टिका करणे म्हणजे विकास होत नाही याचेही विरोधकांनी भान ठेवावे, असा सल्लाही पालकमंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.

अनधिकृत वाळू उत्खनन झाल्यास कारवाई होणारच: पालकमंत्री
वाळू लिलाव अद्याप सुरु झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील वाळू व्यवसायिकांनी अनधिकृत वाळू उत्खनन करू नये, असे आवाहन करतानाच जर जिल्ह्यात कोठे अनधिकृत वाळू उत्खनन करताना सापडला तर त्यांच्यावर कारवाई होणारच, असे स्पष्ट करताना मालवण तहसीलदार यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना शिक्षा करणार, असेही पालकमंत्री केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचा सन्मान राखावा
जिल्ह्यात एकतर अधिकऱ्यांची संख्या कमी आहे. त्यात कोणी जिल्ह्यात येण्यास तयार होत नाही त्यामुळे आपण अधिकाऱ्यांवर कठोरता दाखवत नाही. मात्र असे असले तरी अधिकाऱ्यांनी चुकीचे वागले तर आपण सहन करणार नाही. त्यांना तिन वेळा सुधारण्याची आपण संधी देतो मगच पुढील निर्णय घेतो. अधिकाऱ्यांशी आपण नम्रतेने वागत असलो तरी त्यांनी लोकप्रतिनिधींचा सन्मान राखलाच पाहिजे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही पालकमंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.