
सामना प्रतिनिधी । मुंबई
मी काहीही चुकीचं केलेलं नाही. माझ्या विरोधात करण्यात आलेले लाचखोरीचे आरोप पूर्णतः खोटे आहेत असे स्पष्टीकरण सीबीआयचे माजी संचालक अलोक वर्मा यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) वर्मा यांच्याकडून मागवलेल्या स्पष्टीकरणात त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
सीबीआयमध्ये उफाळून आलेल्या अंतर्गत वादानंतर सर्वोच्च न्यायालयाने अलोक वर्मा यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा तपास करण्याचे निर्देश सीव्हीसीला दिले. त्यानुसार सीव्हीसीकडून अलोक वर्मा यांना एक प्रश्नावलीच पाठविण्यात आली. प्रत्युत्तरात वर्मा यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावतानाच सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्धचा एफआयआर वेबसाइटवर का टाकला नाही याचेही स्पष्टीकरण केले आहे. या विषयीची शोधमोहीम ‘एफआयआर’वरच आधारित असल्याने तो वेबसाइटवर अपलोड करण्यास सीबीआयला उशीर झाला. याविषयीचा अहवालही न्यायालयाला सादर करण्यात आला असून एफआयआरची प्रत तर पहिल्या 24 तासांतच न्यायालयाला देण्यात आली.






















































