
सामना प्रतिनिधी । पुणे
मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री कार्यालय आणि निवासस्थान ‘सिंहासन’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी केली होती. त्यावेळी चित्रपटासाठी मुख्यमंत्री कार्यालय उपलब्ध करून देणे अयोग्य असल्याचे सांगत सामान्य प्रशासन विभागाने नियमांची लांबलचक यादी माझ्याकडे दिली. मात्र, आपण प्रशासन विभागाची नोटीस ‘ओव्हररुल’ करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे प्रशासकीय निर्णय ‘ओव्हररुल’ करण्यात माझा हातखंडाच असल्याची टिप्पणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.
ग्रंथाली, अरुण साधू कुटुंबीय व मित्रमंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, आशय फिल्म क्लब, एव्हरेडी एण्टरटेन्मेंट अॅण्ड दिवाज प्रॉडक्शनतर्फे अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाच्या शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. खासदार कुमार केतकर, अरुण साधू, संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख प्रा. उज्ज्वला बर्वे, एव्हरेडी एण्टरटेन्मेंटच्या अश्विनी दरेकर, ‘ग्रंथाली’चे संस्थापक दिनकर गांगल, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल उपस्थित होते.
बूट पॉलिश करणाऱ्या मुलांनी केले स्वागत
बूट पॉलिश करून इयत्ता अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेणाऱ्या विशाल उत्तेकर आणि विकास उत्तेकर यांनी यावेळी शरद पवार यांचे स्वागत केले. या मुलांना पवार यांच्या हस्ते शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
































































