
राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. 44 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून आज पुन्हा 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांची मुंबईचे वैद्यकीय शिक्षण आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे जिल्हाधिकारीपदाचाही अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शिवराज श्रीकांत पाटील यांची महानंदच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मिताली सेठी यांची नागपूरच्या वनामतीच्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंग यांची नियुक्ती महा आयटी महामंडळात व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली आहे. संभाजीनगर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना असंघटित कर्मचारी विकास आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी, दीपक कुमार मीना यांची नियुक्ती अतिरिक्त आदिवासी आयुक्तपदी, सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ विनय गोवडा यांना चंद्रपूरचे आयुक्त म्हणून, तर नंदुरबार जिल्हा परिषदेचे सीईओ आर. के. गावडे यांची नियुक्ती मुंबईचे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे. माणिक गुरसाल यांची अतिरिक्त आयुक्त (उद्योग), आस्थिक कुमार पांडे यांची संभाजीनगर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. लीना बनसोड आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, तर आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंगल यांची एमएमआरडीएचे सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पालघर जिल्हा परिषद सीईओ एस. के. सालीमठ यांची नियुक्ती सहव्यवस्थापकीय संचालक सिडको म्हणून करण्यात आली आहे.



























































