तुकाराम मुंढेंची दोन महिन्यांत दुसऱ्यांदा बदली, शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने आज सहा आयएएस अधिकऱ्यांच्या बदल्या केल्या. तुकाराम मुंढे यांची अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून सप्टेंबर महिन्यात मुंढे हे आरोग्य आयुक्तपदी रुजू झाले होते. दरम्यान, 16 वर्षांच्या सेवेमध्ये तुकाराम मुंढे यांची 20 पेक्षा अधिक वेळा बदली झाली आहे.

तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत एक परिपत्रक काढले होते. यामध्ये आरोग्य खात्यातील विभागप्रमुख, प्रादेशिक विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख, इतर अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयीन शिस्तीचे पालन करण्याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या.

तुकाराम मुंढे यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारीपदी नियुक्ती करण्यात आल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याबाबतचे लेखी आदेश निघाले नव्हते.

या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या

भाग्यश्री बानाईत ः मुख्य कार्यकारी अधिकारी, शिर्डी संस्थान यांची बदली सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर या पदावर.

व्ही. एन. सूर्यवंशी ः अतिरिक्त आयुक्त एमएमआरडीए यांची बदली आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क या पदावर.

 एस. एम. कुर्ती कोटी ः यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा या पदावर.

एस. एस. चव्हाण ः यांची नियुक्ती आयुक्त कृषी या पदावर.