
सामना प्रतिनिधी । लीड्स
शनिवारची हिंदुस्थान-श्रीलंका विश्वचषक लढत सुरू असताना आकाशात ‘जस्टिस फॉर कश्मीर’ (कश्मीरला न्याय द्या) असा फलक विमानाच्या मदतीने फिरवण्याच्या प्रकारावरून आता इंग्लंडमधील वर्ल्ड कपला राजकीय रंग चढण्याची भीती वाढली आहे. आयसीसीने स्पर्धेला दिलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढत पाकिस्तानी वंशाच्या कश्मीरमुक्ती समर्थकांनी हेडिंगले स्टेडियमवरून ‘जस्टिस फॉर कश्मीर’ (कश्मीरला न्याय द्या) आणि ‘इंडिया स्टॉप जेनोसाइड, फ्री कश्मीर’ (हिंदुस्थानने वंशहत्या थांबवावी, कश्मीरला मुक्त करावे) असा फलक झळकवणारी विमाने फिरवली. त्यामुळे आयसीसी संतप्त झाली आहे. राजकीय फलकबाजी खपवून घेणार नाही असा संतप्त इशाराच त्यांनी इंग्लंडमधील कश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी शेरेबाजी करणार्या आंदोलकांना दिला.
याच स्टेडियमवर 29 जूनला अफगाणी–पाकिस्तानी समर्थक भिडले होते
याच हेडिंगले स्टेडियमवर 29 जून रोजी झालेल्या अफगाणिस्तान-पाकिस्तान सामन्यादरम्यान ‘जस्टिस फॉर बलोचिस्तान’ (बलुचिस्तानला न्याय द्या) असे फलक झळकले होते. उभय देशांचे पाठीराखे त्यानंतर स्टेडियम परिसरात एकमेकांना भिडले होते. दोन्ही देशांच्या समर्थकांमध्ये मोठा वाद झाल्याने राडेबाजी करणार्या समर्थकांना स्टेडियमबाहेरही काढण्यात आले होते. इंग्लंडच्या उत्तरेकडे असलेल्या यॉर्कशायरमध्ये पाकिस्तानी वंशाचे नागरिक मोठय़ा प्रमाणावर असून ब्रॅडफर्ड हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळेच हे राजकीय वाद उद्भवल्याचे आयसीसी आणि यॉर्कशायर पोलिसांचे म्हणणे आहे.

























































