ICICI कर्ज घोटाळा- कोचर दाम्पत्य, धूत यांना सीबीआय कोर्टाचे समन्स

आयसीआयसीआय बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणातील आरोपपत्राची विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी गंभीर दखल घेतली. या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन ग्रुपचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांना न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्यानुसार सर्व आरोपींना 2 ऑगस्टला विशेष न्यायालयापुढे हजर राहावे लागणार असून त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

चंदा कोचर यांनी वरिष्ठ पदाचा दुरुपयोग करून आयसीआयसीआय बँकेच्या निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. तसेच इतर आरोपींसोबत कट रचून व्हिडीओकॉन ग्रुपच्या कंपन्यांना क्रेडिट सुविधा मंजूर केल्या. त्या बदल्यात 64 कोटींची लाच घेतली, असा आरोप सीबीआयने मागील सुनावणीवेळी केला होता. त्याचवेळी आरोपपत्राची दखल घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती. तपास यंत्रणेच्या त्या विनंतीला अनुसरून विशेष सीबीआय न्यायाधीश एस. पी. नाईक-निंबाळकर यांनी बुधवारी आरोपपत्राची गंभीर दखल घेतली. तसेच सर्व आरोपींना 2 ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले. सीबीआयने एप्रिलमध्ये चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध 3250 कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळय़ात 11 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतरच्या सुनावणीत सीबीआयने कर्ज घोटाळय़ातील चंदा कोचर यांचा सहभाग निदर्शनास आणून दिला होता.