जोगेश्वरीतील बेकायदा कॉल सेंटर, आरोपीचा जामीन हायकोर्टाने फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-high-court

जोगेश्वरीत बेकायदा कॉल सेंटर चालवणाऱया आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. या कॉल सेंटरमधून परदेशी नागरिकांना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिली जात होती. शाबाद खान असे या आरोपीचे नाव आहे. कॉल सेंटरमधून परदेशी नागरिकांना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिली जात होती. याच्या तपासासाठी खानची चौकशी होणे आवश्यक आहे. त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही, असे न्या. सारंग कोतवाल यांच्या एकल पीठाने स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण…

जोगेश्वरी येथे बेकायदापणे कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती पोलिसांना 2021मध्ये मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकली. कॉल सेंटरचा परवाना आहे का, अशी विचारणा पोलिसांनी तेथील कर्मचाऱयांकडे केली. कर्मचाऱयांकडे कोणताही परवाना नव्हता. पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला. तेव्हापासून खान फरार आहे. अटकपूर्व जामिनासाठी खानने याचिका दाखल केली होती.

खानची मागणी

पोलीस तपासाला सहकार्य करण्यास मी तयार आहे. त्यासाठी माझ्या कोठडीची आवश्यकता नाही. मला अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी खानने केली होती.

पोलिसांचा युक्तिवाद

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कॉल सेंटरमधून परदेशी नागरिकांना ऑनलाईन औषधे विकली जात होती. त्याचे पैसे खानच्या बँक खात्यात जमा होत होते. त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद पोलिसांनी केला. तो न्यायालयाने मान्य केला.