दिघ्यातील बेकायदा इमारतीत घरांची खरेदी-विक्री जोरात; दहा लाख रुपयांत वन बीएचके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

दिघा येथील एमआयडीसीची जागा हडप करून बांधण्यात आलेल्या 99 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर एमआयडीसीने आतापर्यंत चार इमारतींवर बुलडोझर फिरवून आठ इमारती सील केल्या. त्यामुळे एकीकडे दिघ्यातील रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले असताना दुसरीकडे या बेकायदा इमारतींमधील घरांची विक्री मात्र सध्या जोरात सुरू आहे. फक्त दहा लाख रुपयांमध्ये वन बीएचके घरांचे व्यवहार होत असून नवीन रहिवाशांना पाहिल्यानंतर जुने रहिवासी मात्र अवाक झाले आहेत.

व्यवहार फक्त स्टॅम्प पेपरवर एखाद्या बिल्डरकडे घर बुक केले तर ते घर दुसऱया कुणालाही खरेदी करता येऊ नये आणि त्याची दुय्यम निबंधक कार्यालयात दुसऱयांदा नोंदणी होऊ नये, यासाठी घरमालकाला व्यवहार पूर्ण होण्यापूर्वी संबंधीत घराची तात्पुरती नोंदणी करता येते. आधुनिक सुविधा उपलब्ध असताना दिघ्यातील घराचे व्यवहार मात्र सध्या फक्त स्टॅम्प पेपरवर सुरू आहेत. एका हातात पैसे आणि दुसऱया हातात घराची चावी असे समीकरण जुळवले जात आहे.

  • एमआयडीसी प्रशासनाने पहिल्या टप्प्यात शिवराम, केरू प्लाझा आणि पार्वती या इमारतींवर बुलडोझर फिरविला. त्यानंतर गेले दोन दिवस झालेल्या कारवाईत पांडुरंग ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली.
  • दिघ्यातील आठ इमारती न्यायालयाने रिकाम्या करून त्यांना सील ठोकले आहे. अन्य उरलेल्या इमारतींवर एमआयडीसीच्या कारवाईची टांगती तलवार आहे.
  • कधी बुलडोझर चालविला जाईल याचा नेम नाही. हे वास्तव असतानाही दिघ्यातील या अनधिकृत इमारतींमध्ये घरांची खरेदी-विक्री बिनधास्त सुरू आहे. बिंदू माधव नगरमध्ये उभे राहिलेले अनभुले निवास या इमारतीत दोन फ्लॅटची विक्री गेल्या 15 दिवसांपूर्वी झाली.
  • या दोन्ही फ्लॅटचा व्यवहार प्रत्येकी 10 लाख रुपयांत झाला. इतक्या कमी किमतीत 600 चौरस फूट क्षेत्रफळाचा वन बीएचके मिळाला म्हणून मालक जरी खूश झाले असले तरी या व्यवहाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.