अवैध सावकारीविरोधात ‘सहकार’चे जामखेडमध्ये एकाच वेळी तीन छापे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाने जामखेड तालुक्यात एकाच वेळी तीन ठिकाणी धडक कारवाई करीत आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत. जामखेड तालुक्यात अवैध सावकारीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत सहकार विभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही धडक कारवाई केली.

तालुक्यात एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकत अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत कोरे धनादेश, खरेदीखते, तसेच इतर आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

जामखेड तालुक्यात अवैध सावकारी सुरू असल्याबाबत प्रशासनाकडे आवश्यक कागदपत्रांसह तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, विभागीय निबंधक संभाजी निकम आणि जिल्हा निबंधक मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निबंधक तथा सावकारांचे सहायक निबंधक दिलीप तिजोरे यांनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश करून जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या समन्वयाने विविध पथके तयार करून ही कारवाई केली.

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम-2014च्या कलम 16अन्वये ही कारवाई करण्यात आली. सहकार विभागाचे 16 अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस दलाचे सहा अधिकारी अशा 22 जणांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी दोन संशयित ठिकाणांवर छापे टाकले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अवैध सावकारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. छाप्यांदरम्यान कोरे धनादेश, खरेदीखते, आर्थिक नोंदी असलेल्या वह्या, तसेच इतर महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.

या कागदपत्रांच्या आधारे पुढील तपास आणि चौकशी सुरू करण्यात आली आहे. सहकार विभागाने तालुक्यातील सर्व नागरिकांना अवैध सावकारीविरोधात जामखेड येथील सहायक निबंधक कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह तक्रार दाखल केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सहकार विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने जामखेड तालुक्यात तीन ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. सध्या या सर्व कागदपत्रांची पडताळणी व चौकशी सुरू आहे. पडताळणीअंती पुढील कारवाई केली जाईल. – दिलीप तिजोरे, सहायक निबंधक, जामखेड