
भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी नैऋत्य मान्सूनसंदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत देशातील अनेक महत्त्वाच्या भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून जून महिन्यापासून अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, यंदाच्या मान्सून हंगामात देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
डॉ. महापात्र म्हणाले की, “जून ते सप्टेंबर या कालावधीसाठीचा दुसऱ्या टप्प्यातील मान्सून अंदाज जाहीर करण्यात आला आहे. देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्के पावसाची अपेक्षा आहे.”
अनेक भागांत कमी पावसाचा अंदाज
ईशान्य हिंदुस्थानात दीर्घकालीन सरासरीच्या ९४ ते १०६ टक्क्यांदरम्यान म्हणजेच सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र मध्य हिंदुस्थान, दक्षिण द्वीपकल्पीय भाग, वायव्य हिंदुस्थान आणि मान्सून कोअर झोनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जून महिन्याबाबत बोलताना डॉ. महापात्र यांनी सांगितले की, देशाच्या बहुतांश भागांत पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९२ टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र वायव्य हिंदुस्थान, ईशान्येकडील काही भाग आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही प्रदेशांत सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.
जूनमध्ये तापमानही वाढणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून महिन्यात देशातील बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. मध्य, वायव्य आणि पूर्व हिंदुस्थानातील काही भाग याला अपवाद असतील. किमान तापमानही बहुतांश भागांत सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अनेक राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
हवामान विभागाने उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये यंदा उष्णतेच्या लाटेचे दिवस सरासरीपेक्षा अधिक राहतील, असा इशारा दिला आहे. याशिवाय महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडूतील काही भागांमध्येही उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
समुद्रातील परिस्थितीबाबत माहिती देताना डॉ. महापात्र यांनी सांगितले की, सध्या तटस्थ ENSO परिस्थिती हळूहळू एल निनोकडे सरकत आहे. जूनमध्ये एल निनो निर्माण होण्याची शक्यता ८२ टक्के असून जुलै आणि ऑगस्टमध्ये ती ९० टक्क्यांहून अधिक होण्याचा अंदाज आहे.
मान्सूनने अंदमान-निकोबार बेटांवर, तसेच पोर्ट ब्लेअर परिसरात पूर्णपणे प्रवेश केला असून तो पूर्व बंगालच्या उपसागरातील काही भागांपर्यंत पोहोचला आहे. पुढील आठवडाभरात मान्सूनची आणखी प्रगती होऊन तो अरबी समुद्रातील अधिक भाग, बंगालच्या उपसागरातील उर्वरित क्षेत्र, ईशान्येकडील राज्यांचे काही भाग आणि देशाच्या अतिदक्षिण भागात दाखल होण्याची शक्यता आहे.
मान्सूनचा हंगाम साधारणपणे १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत असतो. त्यानंतर सुमारे १७ सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे सध्या मान्सूनबाबत चिंता करण्याचे कारण नाही. उलट मान्सूनचे आगमन होत असून उष्णतेपासून मोठा दिलासा मिळत आहे.
कालपासून अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळे उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी झाली आहे. वायव्य हिंदुस्थान, मध्य हिंदुस्थान आणि पूर्व हिंदुस्थानातील अनेक भागांत ३१ मेपर्यंत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ३१ मेपर्यंत तरी उष्णतेच्या लाटेची परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
VIDEO | IMD DGM Mrityunjay Mohapatra on present weather conditions and upcoming monsoon, says, “The monsoon season has successfully advanced across the entirety of the Andaman and Nicobar Islands, including Port Blair, and has reached parts of the eastern Bay of Bengal. Over the… pic.twitter.com/DQljZ59Igf
— Press Trust of India (@PTI_News) May 29, 2026




























































