
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये लवकरच 40 हजार विविध पदांची भरती सुरू होणार आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱयांची परिषद आज ‘सह्याद्री’ शासकीय अतिथीगृहात झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात निर्देश दिले.
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद-पंचायतीमध्ये 55 हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील 40 हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरू केली जाणार आहे. यावेळी राज्य संवर्गात 1983 पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील 3720 पदांची भरती करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेतील 8490 पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ती येत्या मे महिन्याअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. महानगरपालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषयक बाबी पूर्ण करून भरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यावेळी उपस्थित होते.
रुग्णालये, शाळांना अधिकाऱयांनी भेटी द्याव्यात
महापालिका, नगरपरिषदांच्या शाळा आणि रुग्णालयांना आयुक्त आणि मुख्याधिकाऱयांनी भेटी देऊन स्वच्छतेवर भर द्यावा. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना एकाच ठिकाणी सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात याव्यात अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. कोविडपासून खबरदारी घेण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यासह रुग्णालयांच्या इमारती तेथील ऑक्सिजन आणि अग्निशमन सुविधांचे परीक्षण करुन घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मुंबई महानगरपालिकेकडे रुग्ण खाटा, व्हेंटिलेटर, डायलिसिस यंत्रे आदी उपकरणे उपलब्ध असून नगरपालिकांनाही ती विनामूल्य देण्यात येणार आहेत.





























































