
भाचीसोबत असलेल्या पेमसंबंधांच्या रागातून मामाने भाचीच्या प्रियकराचा खून केल्याची घटना मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभू पोपट सूर्यवंशी (वय 22, रा. लंगरपेठ, मिरज) असे मृताचे नाव असून, सुनील ऊर्फ सोन्या शिवाजी शिंदे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानदेव अरविंद सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी दर्गा रस्त्यावर प्रभू सूर्यवंशी व ज्ञानदेव सूर्यवंशी हे दुचाकीवरून जात असताना त्यांच्यासोबत असलेल्या सुनील शिंदे याला भाचीने गळफास लावून घेतल्याचा फोन आला. त्यामुळे सुनील शिंदे याने प्रभू सूर्यवंशी याची दुचाकी थांबवून प्रभू याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली.
सुनील शिंदे हा मिरजेत इंदिरानगर येथे बहिणीकडे राहत होता. मृत प्रभू हा सुनील याचा नातेवाईक असून, सुनीलच्या मेहुण्याच्या हॉटेलात तो काम करीत होता. यावेळी त्याचे सुनीलच्या बहिणीच्या मुलीशी सूत जुळले होते. प्रभू याने सुनीलला या प्रेमप्रकरणाची माहिती देऊन दोघांचे लग्न लावून न दिल्यास दोघेही आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली होती. मात्र, या लग्नास विरोध असल्याने सुनील याने प्रभू याला ‘तू गावी चल तेथे गळफास लावून घे’ असे सांगितले. प्रभू व त्याचा नातेवाईक ज्ञानदेव सूर्यवंशी यांना सोबत घेऊन सुनील शिंदे हा मिरजेतून लंगरपेठला दुचाकीवरून जात होता. तिघेजण गुंडेवाडीत पोहोचले असता, तेथे सुनीलला भाचीने घरात गळफास लावून घेतल्याचा बहिणीचा फोन आला. यामुळे रागाच्या भरात सुनीलने ‘तुझ्यामुळे माझ्या भाचीने गळफास लावून घेतला. तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणून तेथे रस्त्यावर पडलेल्या लाकडी दांडक्याने प्रभूच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. डोक्यात घाव बसल्याने गंभीर जखमी अवस्थेत प्रभू सूर्यवंशी याला मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.



























































