Ind Vs Eng हिंदुस्थान मालिका विजयाच्या उंबरठ्यावर अश्विन, कुलदीपपुढे पाहुण्यांची दाणादाण

हिंदुस्थानी फिरकी अस्त्रापुढे इंग्लंडचा बॅझबॉल ढुस्स झाला. पहिले दोन दिवस पिछाडीवर पडलेल्या हिंदुस्थानने चौथ्या कसोटीच्या तिसऱया दिवशी जबरदस्त पुनरागमन करत मालिका विजयाच्या दिशेने पावले टाकली आहेत. इंग्लंडने गेल्या दोन वर्षांत बॅझबॉल खेळ करताना एकही मालिका गमावली नव्हती. मात्र हिंदुस्थानी भूमीवर त्यांचे बॅझबॉल बॅडबॉल ठरले आहे. पहिल्या डावात 46 धावांची आघाडी मिळवून इंग्लंडने कसोटीवर पकड घेतली होती. मात्र कसोटीचा तिसरा दिवस हिंदुस्थानसाठी आनंद घेऊन आला आणि इंग्लिश फलंदाजांची अक्षरशः फिरकी घेत सामन्याला कलाटणी दिली. अश्विन रविचंद्रन आणि कुलदीप यादवने बॅझबॉलप्रेमी इंग्लंडचा 145 धावांत खुर्दा पाडला. विजयासाठी आवश्यक 192 धावांचा पाठलाग करणाऱया हिंदुस्थानने बिनबाद 40 अशी मजल मारत मालिका विजयाच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जैसवाल त्यावर शिक्कामोर्तब करण्यात हमखास यशस्वी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या जैसबॉल की बॅझबॉल यशस्वी ठरतो ते पाहणे निश्चितच थरारक असेल.

इंग्लंडच्या पहिल्या डावातील 353 धावांना प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानची एक वेळ 7 बाद 177 अशी दुर्दशा झाली होती; मात्र ध्रुव जुरेलच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानने पहिल्या डावात 103.2 षटकांत 307 धावसंख्येपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात 46 धावांची आघाडी मिळविणाऱया इंग्लंडची रविचंद्रन अश्विन व कुलदीप यादव या हिंदुस्थानी गोलंदाजांनी चांगलीच फिरकी घेतली. त्यामुळे पाहुण्यांची दुसऱया डावात केवळ 53.5 षटकांत 145 धावांत दाणादाण उडाली अन् यजमान हिंदुस्थानला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य मिळाले.

जुरेलची झुंजार फलंदाजी

दरम्यान, हिंदुस्थानने दुसऱया दिवसाच्या 7 बाद 219 धावसंख्येवरून रविवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. हिंदुस्थानचा पहिला डाव संकटात असताना ध्रुव जुरेल (90) व कुलदीप यादव (28) यांनी झुंजार फलंदाजी केली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. जेम्स अॅण्डरसनने कुलदीपला बाद करीत ही जोडी पह्डली. त्यानंतर जुरेलने आलेल्या आकाश दीपच्या (9) साथीत 40 धावांची भागीदारी केली. शोएब बशीरने आकाशला पायचीत पकडले. जुरेलने 149 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांसह 90 धावांची खेळी करीत हिंदुस्थानला पहिल्या डावात 307 धावसंख्येपर्यंत नेले. मात्र, त्याचे दहा धावांनी हुकलेले शतक सर्वांच्या मनाला चटका लावून गेले. टॉम हार्टलीने त्रिफळा उडवून जुरेलचे पहिल्या कसोटी शतकाचे स्वप्न भंगविले. इंग्लंडकडून शोएब बशीरने 5, तर टॉम हार्टलीने 3 फलंदाज बाद केले. जेम्स अॅण्डरसनला 2 बळी मिळाले.

चहापानानंतर इंग्लंड गारद

चहापानानंतर रवींद्र जाडेजाने पहिल्याच चेंडूवर सेट फलंदाज जॉनी बेयरस्टॉला (30) पाटीदारकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला बहुमोल बळी मिळवून दिला. त्यानंतर कुलदीप यादवने 41व्या षटकात टॉम हर्टली (7) व ओली रॉबिन्सन (0) यांची एकाच षटकात शिकार केली. हर्टलीने सर्फराजकडे झेल दिला, तर रॉबिन्सन पायचीत झाला. मग अश्विनने बेन पह्क्स (17) व जेम्स अॅण्डरसन (0) यांनाही एकाच षटकात बाद करीत 145 धावसंख्येवर इंग्लंडचा डाव संपविला.

अश्विनने केली कुंबळेची बरोबरी

रविचंद्रन अश्विनने अनिल कुंबळेचा मायदेशातील सर्वाधिक बळींचा विक्रम तर मोडलाच, पण त्याच्या आणखी एका कामगिरीची बरोबरी केली. पुंबळेने कसोटी कारकिर्दीत 35 वेळा एका डावात 5 बळी टिपले आहेत. अश्विननेही आज कारकीर्दीत 35व्यांदा एका डावात 5 बळी टिपण्याचा पराक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक 67 वेळा 5 बळी टिपण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे.

बाबांना ठोकला जुरेलने सॅल्यूट

ध्रुव जुरेलने आपले पहिले कसोटी अर्धशतक पूर्ण होताच आपल्या बाबांना सॅल्यूट ठोकला. जुरेलचे बाबा नेम सिंह हे सैन्यात सेवेत होते आणि त्यांनी कारगिल युद्धातही सहभाग घेतला होता. जुरेलने आपले शतक आपल्या बाबांना समर्पित केले. त्यालाही आपल्या बाबांप्रमाणे सैन्यात दाखल व्हायचे होते. सैन्यशाळेत शिकताना तो जलतरणही शिकला होता. मात्र गल्ली क्रिकेट खेळताना त्याला क्रिकेटवर प्रेम जडले आणि त्याची पावले सैन्याऐवजी क्रिकेटकडे वळली.

कुलदीपची जादू

पहिल्या डावात केवळ 12 षटके गोलंदाजी केलेल्या चायनामन कुलदीप यादवची जादू बघायला मिळाली. इंग्लंडची एका बाजूने पडझड सुरू असताना दुसऱया बाजूने सलामीवीर झॅक क्राऊलीने आकर्षक फटके मारून इंग्लंडला धावांची शंभरी ओलांडून दिली. त्याने अश्विन-जाडेजा जोडीचा सहजतेने सामना केला. मग रोहितने कुलदीपच्या हाती चेंडू सोपविला. त्याने आपल्या तिसऱयाच षटकात क्राऊलीचा त्रिफळा उडवून इंग्लंडला चौथा धक्का दिला. क्राऊलीने 91 चेंडूंत 7 चौकारांसह 60 धावांची खेळी केली. मग कुलदीपने कर्णधार बेन स्टोक्सच्या (4) यष्टय़ा उद्ध्वस्त करून इंग्लंडची 5 बाद 120 अशी दुर्दशा केली.

अश्विनने कापली आघाडीची फळी

पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या हिंदुस्थानने दुसऱया डावात जबरदस्त पलटवार केला. कर्णधार रोहित शर्माने रवींद्र जाडेजा व रविचंद्रन अश्विन या अनुभवी फिरकी गोलंदाजांना सुरुवातीलाच मोर्चावर आणले. अश्विनने आघाडीची फळी कापून कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरविला. त्याने पाचव्या षटकात बेन डकेट (15) व आलेला ओली पोप यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर अश्विनने पहिल्या डावातील शतकवीर जो रूटला (11) पायचीत पकडून इंग्लंडची अवस्था 17 षटकांत 3 बाद 65 केली. पंचांनी रुटला बाद दिले नव्हते, पण अश्विनच्या आग्रहाखातर रोहितने डीआरएस घेतला अन् निर्णय हिंदुस्थानच्या बाजूने लागला.

अश्विनने रचला इतिहास

रांची कसोटीत 5 बळी टिपणाऱया रविचंद्रन अश्विनने मायदेशात सर्वाधिक 354 कसोटी बळी टिपत माजी फिरकीपटू अनिल पुंबळेचा (350) विक्रम मोडून नवा इतिहास रचला. मायदेशातील सर्वाधिक बळींच्या बाबतीत या दोघांच्या नंतर हरभजन सिंग (265), कपिल देव (219) व रवींद्र जाडेजा (211) हे अनुक्रमे तीन ते पाच क्रमांकावर आहेत.