
पर्थवर होणाऱ्या पहिल्या कसोटीत केएल राहुल आणि अभिमन्यू ईश्वरनला संघात स्थान निर्माण करता यावे म्हणून ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱया अनधिकृत कसोटीत हिंदुस्थान अ संघातून खेळविण्यात आले, पण दोघेही मेलबर्नवर सुरू झालेल्या पर्थच्या सराव परीक्षेत अपयशी ठरले. ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध प्रथम फलंदाजीला उतरलेल्या हिंदुस्थान अ चा डाव मायकल नेसरच्या भेदकतेपुढे 161 धावांतच आटोपला. पहिल्या कसोटीत कर्णधार रोहित शर्मा खेळण्याची शक्यता कमी असल्यामुळे त्याच्या जागी राहुल किंवा अभिमन्यूच्या निवडीचा जुगार खेळला जाणार होता. मात्र अभिमन्यू शून्यावर तर राहुल 4 धावांवर बाद झाला. नेसरने अभिमन्यू (0), साई सुदर्शन (0), ऋतुराज गायकवाड (4) आणि देवदत्त पडिक्कल (26) या चौघांना टिपत अ संघाचे पंबरडे मोडले. 4 बाद 11 अशी केविलवाणी अवस्था असताना सहाव्या क्रमांकावर आलेल्या ध्रुव जुरेलने 80 धावांची झुंजार खेळी करत हिंदुस्थानला 161 धावांपर्यंत पोहोचवले. 27 धावांत 4 विकेट टिपणाऱया मायकल नेसरला स्नायू दुखावल्यामुळे या सामन्यातून बाहेर जावे लागले. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया अ ची 2 बाद 53 अशी अवस्था होती.

























































