
लडाखमध्ये गस्त घालण्यापासून हिंदुस्थानी जवानांना जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही असा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज केला. संसद अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी त्यांनी आज चीनबरोबर सुरू असलेल्या वादाबद्दल राज्यसभेत स्पष्टीकरण दिले.
‘चीनबरोबरचा सीमा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. मे महिन्यात चीनने सीमेवर अनेकदा घुसखोरीचा प्रयत्न केला. चीन बोलतो एक आणि करतो एक. चर्चा सुरू असतानादेखील 29-30 ऑगस्ट रोजी लडाख सीमेवर चीनने अतिरेक केला.’ असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
राजनाथ सिंह यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- चीनने करार मोडले
चीन हा दोन्ही देशांमधील करारांचा आदर करत नाही. चीनच्या लष्कराने 1993 आणि 1996 मधील करारांचा भंग केला. सीमेवर शांतता राखण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा सन्मान करणे आवश्यक आहे.
- लडाखमधील भूभागावर चीनचा कब्जा
चीनने बेकायदेशीररित्या लडाखमधील 38 हजार चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केला आहे. चीन-पाकिस्तानच्या कथित करारानुसार पाकिस्तानने त्यांचा कब्जा असलेल्या कश्मीरमधील 51180 चौरस किलोमीटरची जमीन अवैधरित्या चीनला दिली आहे. अरूणाचल प्रदेशला लागून असलेल्या 90 हजार चौरस किलोमीटर भूभागावरही चीन दावा करत आहे.
- सीमावर्ती भागात चीनने बांधकामे वाढवली
गेल्या अनेक दशकांपासून चीन सीमेवर जवानांची संख्या वाढवत आहे. सीमावर्ती भागात चीनकडून बांधकामेही वाढली आहेत. केंद्र सरकारनेही सीमा पायाभूत सुविधा विकासासाठी देण्यात येणारा निधी दुपटीने वाढवला आहे.
चीन शेजारी देश असल्याने आपण अधिक सावध असायला हवे होते
कोरोनाला रोखण्यासाठीचा सुवर्णकाळ केंद्र सरकारनं वाया घालवला. चीन आपला शेजारी देश असल्याने आपण अधिक सावध असायला हवे होते, अशा शब्दांत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.



























































