
यंदाचा (2021) ‘जागतिक आनंद निर्देशांक अहवाल’ (वर्ल्ड हॅपी इंडेक्स रिपोर्ट) जाहीर करण्यात आला असून, फिनलॅण्ड देशाने सलग चौथ्या वर्षी पहिला क्रमांक पटकाविला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास संस्थेने हा अहवाल जाहीर केला असून, त्यात 149 देशांत हिंदुस्थानचे स्थान 139 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हिंदुस्थानची स्थिती किंचित सुधारली आहे. विशेष म्हणजे, शेजारील देशांनी या यादीत हिंदुस्थानवर आघाडी घेतली आहे.
पहिल्या 10मध्ये युरोपातील नऊ देश आहेत. फिनलॅण्डखालोखाल डेन्मार्क, स्वित्झर्लंड, आइसलॅण्ड, नेदरलॅण्ड्स, नॉर्वे, स्वीडन, लक्झेमबर्ग व ऑस्ट्रिया यांचा समावेश आहे. एकूण देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी), सामाजिक पाठबळ, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचारपातळी या निकषांवर आनंदी देशांची ही यादी ठरविली जात असते.
या वर्षी ‘कोविड-19’ आव्हानाच्या काळात हा अहवाल कसा तयार करायचा, हे आव्हान होते. कारण जगातील सर्वच देशांना कोरोना विषाणूने जेरीस आणले आहे. या अहवालाच्या लेखकांपैकी एक असलेले जेफ्री सॅक म्हणतात, ‘कोरोना महामारीने आपल्याला जागतिक पर्यावरणाच्या धोक्यांची जाणीव करून दिली आहे. ‘दी वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट-2021’ या अहवालात आपल्याला केवळ संपत्तीपेक्षा लोकांच्या सुख-समाधानाचा वेध घेतलेला दिसेल. शाश्वत विकासाची आव्हाने आपण स्वीकारली नाहीत, तर आपल्याला वाईट स्थितीला तोंड द्यावे लागू शकते, असाच एक संदेश यातून दिला आहे.’
विश्वास महत्त्वाचे मोजमाप
या अहवालाच्या लेखकांनी म्हटले आहे की, ‘विश्कास हे कुठल्याही देशाच्या आनंद निर्देशांकात महत्त्वाचे मोजमाप असते. ज्या देशात नागरिकांची तेथील संस्थांवर श्रद्धा व विश्वास होता व ज्या देशात उत्पन्न समानता जास्त होती, त्या देशांनी कोरोना साथीला चांगल्या पद्धतीने तोंड दिले.’

























































