‘टीम इंडिया’चा आजपासून इंग्लिशचा पेपर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मँचेस्टर

अलीकडच्या काळात टी-२० क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणारी ‘टीम इंडिया’ बहुचर्चित इंग्लंड दौऱ्याची सुरुवात करणार आहे. तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेने या दौऱ्याचा शुभारंभ होत आहे. इंग्लंडनेही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ‘टीम इंडिया’ला हा इंग्लिश पेपर कसा जाणार याकडे तमाम क्रिकेटशौकिनांच्या नजरा असणार आहेत.

हिंदुस्थानने आयर्लंडचा दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेत धुव्वा उडवून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी चांगला सराव करून घेतला, मात्र इंग्लंडनेही ऑस्ट्रेलियावर एकदिवसीय मालिकेत ६-० असे निर्भेळ यश संपादन केलेले आहे. त्यामुळे ‘आयसीसी’ क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या इंग्लंडकडून द्वितीय स्थानावर असलेल्या ‘टीम इंडिया’ला कडवी लढत मिळणार याची कोहलीलाही कल्पना आहे. हिंदुस्थानने मागील २० टी-२० सामन्यांत १५ विजय मिळविले आहे ही विराटची जमेची बाजू होय. डेथ ओव्हरमध्ये उपयुक्त गोलंदाजी करणारा जसप्रीत बुमराह जायबंदी झाल्याने ‘टीम इंडिया’ची थोडी डोकेदुखी वाढली आहे, मात्र उमेश यादवच्या रूपाने सक्षम पर्याय उपलब्ध असल्याने चिंतेचे कारण नाही. इंग्लंडची टीमही भरात असल्याने टी-२० मालिका  उत्कंठावर्धक होण्याची शक्यता आहे.

उभय संघ
हिंदुस्थान : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंडय़ा, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हार्दिक पंडय़ा, सिद्धार्थ कौल, उमेश यादव.
इंग्लंड: इयॉन मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जोनी बेयरस्टा, जॅक बॉल, जोस बटलर, सॅम कुरेन, एलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, आदिल राशिद, जो रूट, जेसन राय, डेव्हिड विली, डेव्हिड मलान.