
वेलिंग्टन, दि. 18 (वृत्तसंस्था)- ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडिया शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 लढतींच्या मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी वेलिंग्टनला गेली होती. मात्र जोरदार पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये फुटबॉल खेळून टाइमपास करताना दिसले. आता दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबरला होणार आहे. वेलिंग्टनमधील पावसकरांच्या तुफानी खेळीने उभय संघांतील क्रिकेटपटूंचा हिरमोड झाला आहे. मात्र या पावसात अखेर ड्रेसिंग रूमच्या आणि आजूबाजूच्या परिसरातील मर्यादित जागेवर इनडोअर फुटबॉल खेळण्याचा आनंद उभय संघांच्या खेळाडूंनी घेतला.
या न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पांडय़ावर सोपवण्यात आली असून संघातून सीनियर्स खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे बलाढय़ न्यूझीलंड संघाला भिडण्याची जबाबदारी युवा ब्रिगेडवर सोपवण्यात आली आहे.

























































