कॉल ड्रॉप होत नाही अशी मोबाईल सेवा सरकारनेच सुचवावी

sanjay-raut-press

कॉल ड्रॉपची समस्या संपूर्ण देशात आहे. दिल्ली विमानतळावरून माझ्या सफदरंजग लेनच्या सरकारी निवासस्थानापर्यंत जाईपर्यंत किमान दहावेळा तरी माझा कॉल ड्राप होतो. सरकार मोठमोठय़ा घोषणा करते. प्रत्यक्षात काहीच घडताना दिसत नाही. त्यामुळे कॉल ड्रॉप होत नाही अशी मोबाईल सेवा आता सरकारनेच आम्हाला सुचवावी, असे सांगत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत सरकारला गुगली टाकली. यावर सरकार निरुत्तर झाले.

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत खासदार राऊत यांनी देशभरात मोबाईलधारकांना भेडसावणाऱया कॉल ड्रापच्या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कॉल ड्रॉप करणाऱया कंपन्यांना दंड करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे, मात्र तरीही ही समस्या आहे. ग्राहक जास्त आणि टॉवर कमी असल्यामुळे ही समस्या अधिक जटील होते. फक्त आणि फक्त अधिकाधिक ग्राहक मिळवणे हाच मोबाईल कंपन्यांचा उद्देश असल्यामुळे कॉल ड्रापची समस्या अधिकच गंभीर झाली आहे. हिंदुस्थान हे जगातील दुसऱया क्रमांकाचे मोबाईल नेटवर्क आहे, मात्र ही समस्या कायम आहे. त्यामुळे सरकारने कॉल ड्राप रोखू न शकणाऱया कंपन्यावर सरकारने बंदी घालावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

त्यावर उत्तर देताना केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून कॉल ड्रापची समस्या कमी करण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगितले. साडेतीन हजार ग्राहकांशी सरकारने संवाद साधला. त्यातून फीडबॅक मिळाला. अडीच कोटींचा दंड मोबाईल कंपन्यांकडून वसूल केल्याचे उत्तर दिले. या उत्तराने समाधान न झाल्यामुळे संजय राऊत यांनी या कंपन्यावर बंदी घालण्याबाबत सरकार का विचार करत नाही, असा सवाल केला. कॉल ड्राप होणार नाही, चांगली इंटरनेट सुविधा आहे अशी मोबाईल सेवा आता सरकारनेच आम्हाला सुचवावी, अशी गुगली राऊत यांनी यावेळी टाकली.

राऊत स्मृती इराणींना निरुत्तर करतात तेव्हा…

खासदार राऊत प्रश्न विचारत असतानाच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पारा नाहकच चढला. राऊत, तुम्ही ओरडून बोलू नका असे इराणी यांनी म्हणताच स्मृतीजी, मी ओरडत नाही तर माझा प्रश्न मांडून सरकारकडून मार्गदर्शन मिळवत आहे, असा टोला मारत स्मृती इराणींना निरुत्तर केले.

आपली प्रतिक्रिया द्या