मितालीचा ‘राज’ संन्यास, ‘लेडी सचिन’च्या क्रिकेटमधील एक्झिटने चाहते हळहळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या धडाकेबाज खेळाने आणि कुशल नेतृत्वाने हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाला अभिमानाचे क्षण दाखवणारी आणि कारकीर्दीत सर्वाधिक विश्वचषक स्पर्धा खेळणाऱया टीम इंडियाची दिग्गज क्रिकेटर मिताली राज हिने आज इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. 39 वर्षीय मिताली एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये हिंदुस्थानी महिला संघाचे नेतृत्व करत होती. मिताली गेल्या 23 वर्षांपासून क्रिकेटशी निगडित आहे.

जून 1999 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मितालीच्या नावावर आहे. तिने 232 सामन्यांमध्ये 50.68 च्या सरासरीने सात हजार 805 धावा केल्या आहेत. हिंदुस्थानी महिला क्रिकेटमध्ये मितालीने साकारलेल्या विक्रमांमुळेच तिला हिंदुस्थानी चाहते प्रेमाने ‘लेडी सचिन तेंडुलकर’ असे म्हणू लागले. आता 39 व्या वर्षीच तिने क्रिकेटमधून घेतलेल्या एक्झिटने क्रिकेटशौकीन हळहळत आहेत.

कृतार्थ मी, कृतज्ञ मी!

‘‘इतकी वर्षे संघाचे नेतृत्व करणे ही एक सन्मानाची गोष्ट होती. त्यामुळे मला एक चांगली व्यक्ती होण्यास मदत झाली. हिंदुस्थानी  महिला क्रिकेटच्या विकासामध्ये मी योगदान देऊ शकले, याचा मला आनंद आहे’’, असे मिताली राज हिने आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. याशिवाय तिने संघातील सर्व सहकारी, बीसीसीआय, बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी आणि सर्व चाहत्यांचेही मोलाच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. भविष्यात हिंदुस्थानी आणि जागतिक क्रिकेटच्या विकासात खारीचा वाटा उचलायला मिळाला तर आनंदच होईल अशी कृतार्थपणाची भावना मितालीने व्यक्त केली आहे.

मितालीच्या नेतृत्वात विश्वचषक अंतिम फेरीत 

मितालीच्या  नेतृत्वाखाली हिंदुस्थानी महिला संघाने 2017 मध्ये महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यापूर्वी, 2005 मध्ये आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जेव्हा हिंदुस्थानचा  ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता तेव्हाही मिताली महिला टीम इंडियाची कर्णधार होती. तिने यंदाच्या महिला विश्वचषकातही देशाचे कर्णधारपद भूषवले होते. मितालीने आतापर्यंत सहा विश्वचषकांमध्ये सहभाग घेतलेला आहे. तिच्या नावावर महिला क्रिकेटमधील अनेक विक्रम नोंदवले गेलेले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या महिला एकदिवसीय क्रमवारीमध्ये ती सातव्या स्थानावर होती. मितालीप्रमाणेच ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर हा एकमेव हिंदुस्थानी क्रिकेटर कारकीर्दीत सहा विश्वचषक खेळला आणि आपल्या कारकीर्दीच्या अखेरच्या वर्ल्ड कपमध्ये त्याने संघाला विजेता बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. टीम इंडियाची अन्य एक ज्येष्ठ क्रिकेटर झुलन गोस्वामी देशासाठी पाच विश्वचषक खेळली आहे.

शानदार क्रिकेट कारकीर्द

             लढती   डाव       धावा       सर्वोच्च     शतके   अर्धशतके

   वन डे    232    211    7805   125 नाबाद     7          64

  कसोटी    12      19      699     214 धावा      1           4

  टी-20     89      84     2364   97 नाबाद      0          17