
इंडियन ओव्हरसीज बँकेची 200 कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने विनोद जतिया समूहावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सीबीआयच्या बँकिंग व सिक्युरिटीज फ्रॉड शाखेने 3 डिसेंबर रोजी विनोद जतिया यांच्या मुंबई येथील घरावर आणि कार्यालयावर धाड टाकली.
जतिया समुहाने या बँकेची 2005 ते 2019 या कालावधी दरम्यान दिशाभूल करत फसवणूक केल्याची तक्रार सीबीआयकडे दाखल करण्यात आली होती. इंडियन ओव्हरसीज बँकेने विनोद जतिया समुहाच्या दिलशाद ट्रेडिंग कंपनी प्रा.लि. आणि त्याचे संचालक विनोद जतिया, नीता जतिया, प्रतीक विनोद कुमार जतिया आणि अन्यांविरोधात सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. सीबीआयने मुंबईतील महालक्ष्मी येथील जतियांच्या निवासस्थानी व हॉर्निमन सर्कल सुखिया इमारतीतील कार्यालयावर टाकलेल्या धाडीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत.
त्यात कंपनीने केलेले सर्क्युलर ट्रेडिंग, बोगस बिलिंग तसेच जतिया समुहातर्फे पुण्यातील कल्याणीनगर येथे बेलमॅक रेसिडन्सी, पनवेल येथे बेलमॅक रिव्हरसाईड हे बांधकाम प्रकल्प आहेत. तेही सीबीआयच्या रडारवर आले आहेत. कंपनीने ट्रेडिंग व्यवसायातील पैसे बांधकाम उद्योगात वळवल्याचा संशय आहे. दरम्यान, करचुकवेगिरी प्रकरणी विनोद जतिया समुहावर यापूर्वी आयकर विभागाने देखील छापेमारी केली होती. समुहाने सर्क्युलर ट्रेडिंग करतानाच समभागांच्या किमतीही वाढवल्या होत्या. तसेच बँकांना चुकीची माहिती सादर केल्याचा ठपका समूहावर आहे. कर चुकवेगिरी प्रकरणी 3500 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस जारी करण्यात आली आहे. समुहाने बांधकाम क्षेत्रात वळवलेले पैसे यांची माहिती देणारी अनेक कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती मिळत आहे. लोकमत या वृत्तपत्राने या संबंधीचं वृत्त दिलं आहे.





























































