सोने खरेदीत हिंदुस्थानी महिला जगात अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

सोन्यात गुंतवणूक करण्यात हिंदुस्थानी महिला फारच पटाईत असून जगातील इतर देशांतील महिलांच्या तुलनेत हिंदुस्थानी महिला सोने खरेदीत अव्वल असल्याचा दावा वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने केला आहे. सध्या हिंदुस्थानात 24 हजार टन सोन्याचा साठा असल्याचा कौन्सिलचा अंदाज असून यातील तब्बल 21 हजार टन सोने हे हिंदुस्थानी महिलांकडे आहे.

दिवाळीतील धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आजही सोने खरेदी करणाऱया लोकांची संख्या कमी नाही. गुंतवणूक म्हणून लोक जमीन खरेदीनंतर सोने खरेदीलाच प्राधान्य देतात. बहुतांश लोक एकूण बचतीपैकी 84 टक्के जमीन खरेदीत, तर 11 टक्के सोने खरेदी करतात. उर्वरित 5 टक्के रक्कम ही बँक खात्यात, शेअर्स किंवा फंडमध्ये गुंतवली जाते.

चीनमध्ये सोन्याचे सर्वाधिक उत्पादन
सोन्याचे उत्पादन घेण्यात चीन आघाडीवर आहे. 2017 मध्ये 426.14 टन सोन्याचे उत्पादन चीनने घेतले होते. चीनने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत सोन्याच्या उत्पादनात नंबर एकचे स्थान पटकावले. या वर्षी चीनने खाणीतून 276 मेट्रिक टन सोन्याचे उत्पादन घेतले आहे. उत्पादनाबरोबरच चीन सोने खरेदीतही नंबर एक आहे. येथे बाळाच्या जन्माच्या वेळी सोन्याची चेन किंवा ब्रेसलेट देण्याची प्रथा आहे. नवीन वर्षात येथे सोन्याची सर्वात जास्त विक्री होते. यावेळी चिनी लोक आपल्या जन्मराशीचे प्रतीक 24 कॅरेट सोने रूपात खरेदी करतात.

तामीळनाडूमध्ये एकूण बचतीच्या 28.3 टक्के सोने खरेदीत गुंतवले जातात. हिंदुस्थानी घरातील सोन्यापैकी 80 टक्के सोने हे दागिने स्वरूपात आहे. आतापर्यंत खाणीतून 1 लाख 90 हजार 40 टन सोने काढण्यात आले. यातील 1.26 लाख टन सोने 1950 नंतर काढण्यात आले. केरळ येथील पद्मनाभ स्वामी मंदिरात 1300 टने सोने असून तिरुपती मंदिरात दर महिना 100 किलो सोने जमा होते. जगात जेवढे सोने आहे त्यातील सुमारे 48 टक्के सोने हे दागिने स्वरूपात आहे.

सोने उत्पादनात हिंदुस्थान पिछाडीवर
सोन्याचे उत्पादन घेण्यात हिंदुस्थान पिछाडीवर आहे. स्टेटिस्टनुसार देशात 2017 मध्ये 1 हजार 594 किलो म्हणजेच दीड टन सोन्याचे उत्पादन झाले. सोने उत्पादनावर कर्नाटक देशात आघाडीवर आहे. 2000 साली सोन्याचे उत्पादन 2615 किलो झाले होते. 2007-08 मध्ये हे उत्पादन 2969 वर पोहोचले होते. मात्र त्यानंतर यात घट झाली. इतर देशांच्या तुलनेत सोने आयातीमध्ये हिंदुस्थान आघाडीवर असून येणारे सोने हे घराघरात साठवून ठेवण्याची संस्कृती आहे.

सोन्याची विभागणी
हिंदुस्थानी महिला – 21 हजार टन
बँका – 750 टन
मंदिरे – 2500 टन

सोने उत्पादन आणि उपयोगातील टॉप पाच देश (उत्पादन, उपयोग टनमध्ये)
देश          उत्पादन     देश         उपयोग
चीन          426        चीन          1089
ऑस्ट्रेलिया   295       हिंदुस्थान      727
रशिया       270       अमेरिका      170
अमेरिका    230        जर्मनी        123
कॅनडा      175       थायलंड         90

summary- indian women are top in purchasing gold