महिला हॉकी संघ करणार ऑस्ट्रेलियाचा दौरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा महिला हॉकी संघ आगामी महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. हांगझू (चीन) येथे होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सराव होण्यासाठी हिंदुस्थानी हॉकी संघ हा दौरा करणार आहे.

हिंदुस्थानी महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर 18 ते 27 मे दरम्यान पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. यात पहिले तीन सामने हे ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध असतील, तर उर्वरित दोन सामने ऑस्ट्रेलिया ‘ए’ संघाविरुद्ध खेळणार आहे. या सर्व लढती अॅडलेड शहरात होणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा महिला हॉकी संघ जागतिक क्रमवारीत तिसऱया स्थानावर आहे, तर हिंदुस्थानी संघ आठव्या स्थानी आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहे. या महत्त्वपूर्ण स्पर्धेच्या आधी हिंदुस्थानसाठी ऑस्ट्रेलियासारख्या खडतर दौऱयाचा फायदा होणार आहे.

‘चीनमध्ये होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी तयारीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाचा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या दौऱयावर हिंदुस्थानी महिला हॉकी संघाच्या क्षमतेची खऱया अर्थाने चाचपणी करता येणार आहे. सध्या बंगळुरूतील राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण (साई) येथे हिंदुस्थानचा महिला हॉकी संघ कसून सराव करत आहे.’

 यानेक शोपमॅन (प्रशिक्षक, हिंदुस्थानी महिला हॉकी संघ)