
मुंबईहून गुरुवारी रात्री दिल्लीला जाणाऱया इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचे तब्बल आठ तासांनंतर उड्डाण झाले. विमानाच्या उड्डाणासाठी पायलट तसेच केबिन क्रूची व्यवस्था वेळेत न झाल्यामुळे या विमानाच्या उड्डाणाला उशीर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागला.
मुंबईहून दिल्लीला जाणारे इंडिगो एअरलाईन्सचे 6 ई-2518 हे विमान रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी उड्डाण करणार होते, मात्र दोन ते तीन तासांनंतर विमानाला उशीर होत असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. अखेर 28 एप्रिलच्या पहाटे 4 वाजता विमानाने दिल्लीसाठी प्रयाण केले. मुळात खराब हवामानामुळे हे विमान मुंबईतच उशिराने दाखल झाले होते. त्यानंतर पुढील उड्डाणासाठी प्रशासकीय आणि केबिन क्रू व्यवस्था करणे यात आणखीनच उशीर झाला. विमानाला जरी उशीर झाला तरी प्रवाशांच्या खानपानाची सोय केल्याचा दावा इंडिगो एअरलाईन्सने केला आहे.




























































