
फेसबुक हा तुमच्या डेटामधून सर्वाधिक पैसे कमावतो. कारण कंपनीच्या कमाईचा मोठा हिस्सा हा जाहिरातीतून येतो. कंपनीला युजर डेटा आणि रिचच्या आधारे जाहिराती मिळतात. म्हणजेच तुमच्या आणि तुमच्या डेटामुळे फेसबुकला पैसे मिळतात. असे असतानाही कंपनी आता तुमच्याकडे पैसे मागण्याची तयारी करत आहे. त्याची सुरुवात ‘इंस्टाग्राम’पासून होत आहे.
कंपनी इंस्टाग्रामसाठीच्या नवीन सबस्क्रिप्शन फीचरवर काम करत आहे. या फीचर अंतर्गत युजर्संना कंटेंट ऍक्सेस करण्यासाठी दरमहा 89 रुपये द्यावे लागतील. याचा फायदा इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनवून टाकणारे आणि इन्फ्ल्यूएन्सर यांना होणार आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र कंपनीच्या या युक्तिवादावर अनेक नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे.
टिपस्टर Aleesandro Paluzziने इंस्टाग्राम सबस्क्रिप्शनबाबत काही ट्विट केले आहेत. त्याने म्हटले आहे की, इंस्टाग्राम सबस्क्राईब बटणाची चाचणी करत आहे, जे क्रिएटर्सच्या प्रोफाइलवर दिसेल. जर तुम्ही 89 रुपये भरून सबस्क्रिप्शन घेतले असेल, तर तुम्हाला एक बॅज मिळेल. जेव्हा तुम्ही कमेंट्स किंवा मेसेज कराल तेव्हा हा बॅज तुमच्या यूजर नेम समोर दिसेल.
दरम्यान, मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने देखील याआधी Twitter Blue आणि Super Follow असे फीचर लॉन्च केले आहे. या अंतर्गत युजरला कोणत्याही अकाऊंटच्या विशिष्ट कंटेंट ऍक्सिस करण्यासाठी सबस्क्रिप्शन घावे लागणार आहे.

























































