नवाब मलिक यांना अंतरिम जामीन नामंजूर; हायकोर्टाने दिलासा नाकारला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांनी अंतरिम जामिनासाठी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला. मलिक यांची प्रकृती अत्यंत गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर मानवतेच्या दृष्टिकोनातून तातडीने अंतरिम जामीन देण्याची विनंती मलिक यांच्यातर्फे करण्यात आली होती.

कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मलिक यांना अटक केली होती. ते सध्या किडनी विकाराने त्रस्त आहेत. त्यामुळे विशेष वैद्यकीय काळजी घेण्याची गरज असल्याचा दावा करीत मलिक यांनी अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यापुढे दीर्घ सुनावणी झाली.