उत्तम कामगिरीचे ध्येय कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयेंद्र लोंढे

सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांत या बॅडमिंटनपटूंनी हिंदुस्थानात चमत्कार घडवून आणला. क्रिकेटवेडय़ा देशात बॅडमिंटनचे वारे वाहू लागले. युवा पिढीची पावले या खेळाकडे वळू लागली. पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सीनियर सर्किटमध्ये पदक विजेते खेळाडू तयार होत असतानाच ज्युनियर स्तरावरही जग जिंकणारे खेळाडू तयार होऊ लागले. नागपूरच्या 49 वर्षीय किरण माकोडे यांच्या परीसस्पर्शामुळे वैभव बिसने, मालविका बनसोड, रश्मी लांबे, वैष्णवी भाले, खुशबू पटेल, भक्ती दहशस्त्र हे युवा स्टार खेळाडू तयार झाले. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानच्या ज्युनियर बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावणारे किरण माकोडे यांच्याशी साधलेला संवाद.

खेळाचे बाळकडू घरातूनच मिळाले का?
– होय, वडील सुरुवातीला फुटबॉल खेळत असत पण नंतर त्यांनी बॅडमिंटन या खेळाकडे मोर्चा वळवला. भाऊही याच खेळामध्ये पारंगत होता. आई उत्तम खो-खोपटू होती. त्यामुळे माझ्या रक्तातच खेळ भिनलाय असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मात्र वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळत होतो. त्यानंतर बॅडमिंटनमध्ये प्रवेश केला.

हिंदुस्थानच्या ज्युनियर बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षकपद मिळेल असे वाटले होते का?
– हो, नक्कीच. मी बरीच वर्षे बॅडमिंटन या खेळासाठी घालवली आहेत. याआधी महाराष्ट्र संघाचा प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून कार्यरत होतो. ज्युनियर स्तरावरही खूप काम केले. त्यानंतर ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टअंतर्गत प्रशिक्षण दिल्या गेलेल्या सात प्रशिक्षकांमध्येही माझा समावेश होता. पुणे व बंगळुरू येथे झालेल्या ट्रेनिंगमध्ये खूप काही शिकायला मिळाले. यामध्ये फिटनेस, मानसिक सक्षमता, परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यांसारख्या इतर महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यामुळे हिंदुस्थानच्या ज्युनियर बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षकपद मिळाल्यानंतर आश्चर्य वाटले नाही. उलट आनंद गगनात मावेनासा झाला.

एक खेळाडू म्हणून सीनियर स्तरावर स्वतःची कारकीर्द फुलवता आली नाही, असे का?
– चेन्नईत राष्ट्रीय स्पर्धेत खेळत असताना वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यानंतर अभ्यास व नोकरीकडे लक्ष द्यावे लागले. वेळेचा अभाव, हलाखीची आर्थिक परिस्थिती, चांगला कोच न मिळणे या सर्व कारणांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर (सीनियर) आपला ठसा उमटवता आला नाही. मात्र आताही 35 वर्षांवरील सारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपली आवड जोपासतोय. आजही बॅडमिंटन खेळण्याची संधी वाया घालवत नाही.

राहुल द्रविड क्रिकेटमध्ये ज्युनियर खेळाडूंच्या कलागुणांना हेरून त्याला पैलू पाडण्याचे काम करतोय, त्याच्या पावलावर पाऊल ठेवतायत का?
– राहुल द्रविडप्रमाणेच काम करायचे आहे, पण क्रिकेट व बॅडमिंटन या दोन खेळांतील प्रशिक्षणात फरक आहे. क्रिकेटप्रमाणे आम्हाला दीर्घकाळ खेळाडूंसोबत राहता येत नाही. नुकताच डच व जर्मनीचा दौरा करून आलो. त्यामध्ये युवा खेळाडूंना फिटनेसपासून सर्व महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करता आले. स्पर्धेनुसार प्रशिक्षणाचे काम ठरलेले असते. वर्ल्ड चॅम्पियनशिपआधी ट्रेनिंग कॅम्पमध्ये खेळाडूंकडून कसून सराव करवून घेतला जातो, पण हा कार्यक्रम टप्प्प्याटप्प्यात होत असतो.

सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांच्यामुळे हिंदुस्थानात बॅडमिंटनचा कायापालट झालाय, याबाबत काय सांगाल…
– बरोबर आहे. दोघींच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्मरणीय कामगिरीनंतर हिंदुस्थानातील युवा पिढी या खेळाकडे करीअर म्हणून बघू लागली आहे. काही वर्षांपूर्वी बॅडमिंटन या खेळाकडे फक्त फिटनेस म्हणून बघितले जात असे. पालकांचाही तोच दृष्टिकोन असायचा. युवा खेळाडू ठराविक कालावधीनंतर अभ्यासाकडे वळायचे. आता बॅडमिंटन या खेळालाच पहिले प्राधान्य दिले जात आहे ही वाखाणण्याजोगी बाब आहे.

कोणते ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे?
– देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून देणारे खेळाडू तयार करायचे आहेत. ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे खेळाडू निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व ऑलिम्पिक गोल्ड कोस्ट यांच्याकडून मोलाचे सहकार्य लाभत आहे. ऍडव्हान्स ट्रेनिंग मिळत आहे. त्यामुळे हे ध्येय नक्कीच पूर्ण होईल याची खात्री आहे.

– [email protected]