
>> दुर्गेश आखाडे
मुलाखत – नितीन शंकर, संगीतकार व तालवाद्य संयोजक
जुनी गाणी आपण ऐकतो… जुनी गाणी ऐकल्यावर ती आपल्या लक्षात राहतात. जितकी जुनी होतात तितकीच ती लोकप्रिय ठरतात. त्या गाण्यांची नशा वाढत जाते. ‘जो जीता वही सिंकदर’, ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘ब्लॅक’, ‘दबंग’, ‘वीरजारा’सारख्या संगीतप्रधान चित्रपटांतील गाण्यांचे संगीतकार व तालवाद्य संयोजक नितीन शंकर यांचे संगीत संयोजन आपल्या लक्षात राहतेच.
n सेकंड होम म्हणून रत्नागिरीची निवड का केलीत?
– मला लहानपणापासूनच निसर्गाची आवड आहे. मी त्या वेळी भाईंना म्हणजेच मारुती कीर यांना भेटण्यासाठी रत्नागिरीत आलो होतो. तेव्हा भाईंचा मुलगा मुन्ना कीर याने मला निवळीतील एका बागेतील घरात थांबवले होते. तेव्हा रात्री आम्ही इकडे तिकडे फिरायचो. त्या वेळी मला हा निवळीतील परिसर खूप आवडला. मी मुन्नाला म्हटलं की, या भागातच मला जागा बघ. मला हा परिसर खूप आवडला आहे. इथे घर बांधायचा माझा विचार सुरू आहे आणि माझं रत्नागिरीतील घराचं स्वप्न पूर्ण झालंच, शिवाय माझे गुरू भाईंनाही भेटण्याची संधी मिळू लागली. मी जेव्हा निवळीत येतो तेव्हा सोबत येताना माझा तबला घेऊन येतो. इथे येऊन रियाज करण्याची जी मज्जा आहे ती औरच.
n पूर्वीचे संगीत आणि सध्याच्या संगीतामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो?
– मला संगीत क्षेत्रात 42 वर्षे झाली. 1978 पासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे. सुरुवातीला मी स्टेज शो करत होतो. लाईव्ह कार्यक्रम करायचो. हळूहळू शिकत शिकत पुढे रेकॉडिंगमध्ये आलो. त्या वेळी जे तंत्रज्ञान होते, संगीत ध्वनिमुद्रित व्हायचे त्या वेळेचे संगीत आणि आजचे संगीत यामध्ये खूप फरक आहे. त्या काळातील संगीत दिग्दर्शकांकडून मला शिकायला मिळाले त्या वेळी संगीत तंत्रज्ञान शून्य होतं. एका गाण्यात 150 जण एकत्र येऊन सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदाच संगीत वाजवत असतं. आज तो जमाना नाही आहे. आजच्या तारखेला तुकडय़ा-तुकडय़ामध्ये गाणं रेकॉर्ड केले जाते. त्याबाबतीत मी स्वतःला नशीबवान समजतो की, आमची पिढी ही शेवटची पिढी आहे की ज्या पिढीने गायक माईकवर असताना संपूर्ण गाणं सर्व संगीतकारांनी एकत्र येऊन वाजवले. ओल्ड इज ऑलव्हेज गोल्ड. प्रत्यक्ष संगीतकारांनी वाजवणं आणि मशीनवर वाजवणं यात खूप फरक आहे. प्रत्यक्ष संगीतकार जेव्हा गाणं संगीतबद्ध करतात तेव्हा ते आपला आत्मा त्यात ओततात.
n संगीताला भाषा असते का?
– संगीताला भाषा नसते. मी स्वतः सर्वोधिक हिंदी भाषेत काम केले आहे. त्याशिवाय बंगाली, तेलगू, मल्याळी. मराठी, आसामी, गुजराती, उडीया, कानडी, तामिळी भाषांमध्ये काम केले आहे. संगीताला भाषा नाही. संगीतात जे शब्द आहेत ते आपण ऐकतो आणि त्यावरच सर्व अवलंबून असते की, आपण काय ऐकतो. पूर्वीच्या गाण्याला खोल अर्थ होता. पूर्वीचे संगीत ऐकलं जायचे, आताचे संगीत पाहिलं जाते. जोपर्यंत तुमच्यासमोर त्या गाण्याचा व्हिडीओ येत नाही तोपर्यंत ते गाणं तुमच्यापर्यंत पोहचत नाही. आता ‘पुष्पा’ चित्रपटाचे उदाहरण घेऊया. त्या चित्रपटातील डान्सच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्सचा सर्व जण व्हिडीओ तयार करतात आणि तो सोशल मीडियावर टाकतात. त्यांना भाषेशी काही देणघेणं नाही. ते शब्द एकदा तुमच्या जिभेवर बसले की मग आपण ते गुणगुणत बसतो. पूर्वीच्या गीतलेखनाला खूप महत्त्व होते.
n जुनी गाणी आणि रिमिक्स गाण्यामध्ये काय फरक जाणवतो?
– पूर्वीचे संगीत हे एखाद्या ‘ओल्ड वाईन’सारखं आहे. ‘ओल्ड वाईन’ जेवढी जुनी होईल तितकी तिची नशा असते. अगदी जुन्या गाण्याचेही तसेच आहे. ती गाणी जितकी जुनी होत आहेत तितकीच त्यांची नशा आपल्या डोक्यातून उतरत नाही. ती गाणी अशीच ऐका त्याचा गोडवा वेगळाच आहे. नवीन गाण्यासाठी यूटय़ूबवर लाईक आणि ह्युजची स्पर्धा असते. जुन्या गाण्यांना हे काही करावं लागत नाही.
n तरुण संगीतकारांकडून आपल्याला काय अपेक्षा आहे?
– मी संगीत क्षेत्रातील पाच पिढय़ांबरोबर काम केले आहे. आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी- आनंदजी, जतीन-ललित, साजिद-वाजिद अलीकडे प्रीतम यांच्यासारख्या संगीतकारांबरोबर मी काम केले आहे. जुन्या संगीतकारांसोबत काम करताना त्यांच्या अनुभवाचा फायदा तर मला मिळतोच, पण तरुण संगीतकारांकडून मला खूप शिकायला मिळते. मी कायम विद्यार्थीदशेत असतो. तरुण संगीतकार नवीन तंत्रज्ञान घेऊन येतात ते आम्हाला शिकायला मिळते. मी त्यांच्यासोबत चर्चा करतो, त्यांच्याकडून तंत्रज्ञान अवगत करून घेतो. तरुण संगीतकार ज्या वेगाने पुढे जात आहेत तो वेग त्यांची भाषा मला माहीत आहे. त्याच्याकडून मला संगणकावरील संगीत शिकायला मिळते. तरुण संगीतकारांबरोबर काम करताना मी ज्या मोठमोठय़ा गुरूंकडून शिकलो आहे. उस्ताद अलारुखाँ, मारुती कीर आणि तौफिकभाई यांच्याकडून मी शिकलो आहे. ते माझे कुठे वाया जात नाही त्याचा सर्व अर्क काढून मी नवीन तंत्रज्ञानामध्ये वापर असतो.
n संगीतकार म्हणून करीअर करू इच्छिणाऱया तरुणांना काय संदेश द्याल?
– तरुणांना मी सांगू इच्छितो की, आपले जे संगीत आहे ती आपली संपत्ती आहे. संगीत, नृत्यकला हे आपल्या देशाचे धन आहे. ते आपण जपलं पाहिजे. आपल्याकडे श्रोते जे संगीत ऐकतात त्यानुसारच संगीताची निर्मिती केली जाते. आपण नवीन काही तरी रॅप संगीत आणलंत तर ते काही संगीत नाही. त्याला किती प्राधान्य द्यायचे ते आपल्या हातात आहे. आपले जे संगीत आहे ते वेगवेगळय़ा फॉर्ममध्ये ऐकत राहिलात तर त्यातून नवनिर्मिती होईल. असंच चांगलं संगीत, संगीत निर्मात्या पंपन्या स्वीकारतील. त्यामुळे आपलं जी संगीत संस्कृती आहे ती वाचविण्याचे काम तरुण पिढीचं आहे.
n सध्या नवीन चित्रपट कोणते करत आहात?
– संगीत दिग्दर्शक प्रीतम यांच्याबरोबर ‘ब्रम्हास्त्र्ा’ चित्रपटासाठी मी तालवाद्य संयोजक म्हणून काम करत आहे. रणवीर कपूर आणि आलिया भट यांचा अभिनय असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी काम करतोय. त्याचबरोबर आणखी पाच-सहा चित्रपटांसाठी तालवाद्य संयोजक म्हणून काम करतोय. सागर वर्ल्डच्या ‘जय मां वैष्णो देवी’ या वेब सीरिजसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम करतोय. मुंबईत गेलो की आणखी एका वेब सीरिजसाठी काम सुरू करणार आहे.
– durgeshakhade5gmail.com


























































