स्वागत दिवाळी अंकांचे

2753

ऑल दि बेस्ट 

दर्जेदार विनोद, व्यंगचित्रे, हास्यचित्रमालिका, वात्रटिका, चारोळ्या  असा हास्याची बरसात करणारा हा दिवाळी अंक वाचकांना आकर्षित करणारा ठरला आहे. दि बेस्ट हास्य (विवेक मेहेत्रे), एक परिसंवाद (महेंद्र भावसार), मे महिन्यात मु. पो. विदर्भ (उमेश कवळे), खड्ड्यांचं उत्खनन (जगदीश कुंटे), यांची हास्यचित्रमालिका मार्मिक आहे. याशिवाय भा. ल. महाबळ, सुधीर सुखटणकर, डॉ. विजया वाड, चंद्रकांत महामिने, प्रियंवदा करंडे, मुकुंद गायधनी, बंडा यज्ञोपवित, डॉ. उर्मिला चाकूर, भालचंद्र देशपांडे आदींच्या विनोदी कथा, लेखात विनोदाची भट्टी जमून आलीय. याशिवाय विनोदी कविता, विडंबन गीते, वात्रटिका असा हास्याचा फराळ अंकात आहे.

संपादिका : वैशाली विवेक मेहेत्रे

मूल्य : 150 रु, पृष्ठे : 160

 

साहित्यरंजन

नेहमीच्या साहित्यिक फराळापेक्षा रिलॅक्स करणारा असा हा विनोदी  दिवाळी अंक आहे. कथा, कविता आणि लघुकादंबरी यांची लेखनशैलीही विनोदी आहे. अकलेचे कांदे ही चंद्रकांत महामिने यांची कादंबरी त्यातील विषयातल्या विसंगतीवर बोट ठेवणारी आहे. याशिवाय विनायक शिंदे, सुभाष डिंगरे, लक्ष्मीकांत भोसेकर, निर्मला मठपती, प्र. द. जोशी, अवधूत म्हमाणे, आर. डी. सोनार आदींच्या खुसखुशीत शैलीतील भाष्य करणार्‍या कथा, लेख, वाचकांना हसविणारे आहेत. लक्ष्मण का हसला व ‘पहिले चरण कालिदासाचे’ भारती मेहता यांचे दोन्ही लेख वेगळ्या धाटणीतले असून वाचनीय आहेत. मान्यवरांच्या कविता तसेच देविदास पावशेशास्त्र्ााr यांचे राशिभविष्यही अंकात आहे.

संपादक : सत्यवान तेटांबे

मूल्य : 150 रु., पृष्ठे : 136

 

हास्यानंद

यंदाच्या अंकाचा विनोद निर्मितीसाठी कथा, लेखक, हास्यचित्र मालिका, कविता, चारोळी, वात्रटिका, ग्राफिटी अशा माध्यमांचा वापर केला आहे. त्यामुळे अंक व वाचताना कंटाळा येत नाही. अंकातील कोणताही लेख हा गमतीशीर शैलीतील आहे. यातील प्रत्येक पान विनोदाची मेजवानी देणारे आहे. गिरिजा कीर, भा. ल. महाबळ, सुधीर सुखठणकर, सुरेश वांदिले, माधव गवाणकर, अविनाश चिंचवडकर आदी मान्यवरांच्या कथा वाचकांना आनंद देणार्‍या आहेत. डॉ. र. म. शेजवलकर, हेमंत मुसरिफ, भालचंद्र गन्द्रs, डॉ. सुधीर मोंडकर, रवींद्र जोगळेकर आदी मान्यवरांच्या कवितांमुळे अंकाचे सौंदर्य वाढले आहे. पानोपानी असणारी व्यंगचित्रे हास्यनिर्मिती करणारी आहेत.

संपादिका : वैशाली मेहेत्रे

मूल्य : 150 रु., पृष्ठे : 176

 

प्रभू प्रभात

या अंकात मान्यवर लेखकांसोबतच नवोदित लेखक-लेखिकांच्या साहित्याचा समावेश आहे. ‘एल्फिन्स्टन गव्हर्नर आणि 19व्या शतकातील पाठारे प्रभू’ (प्रताप वेलकर), आदर्श जीवनाचे सार (सुकुमार राणे) हे लेख वाचनीय आहेत. याशिवाय योगाच्या साथीने कर्करोगावर कशी मात करता येईल, हा माहितीपूर्ण लेख तसेच आपल्या ऋषिमुनींनी कोणकोणते वैज्ञानिक शोध लावले, याविषयीचा लेखही छान. सुजन राणे, अपर्णा कीर्तिकर, मीनल जयकर यांची प्रवासवर्णने उत्साहवर्धक आहेत. स्वाती जयकर, नीना राव, हेमंत तळपदे, अशोक नायक यांचे चटपटीत लेखन शिवाय उर्वशी धराधर, सुरेश नवलकर, ज्योत्स्ना धैर्यवान यांचे वैविध्यपूर्ण लेखन या अंकात वाचता येईल.

संपादिका : वंदना नवलकर,

मूल्य : 25 रु., पृष्ठे : 126

आपली प्रतिक्रिया द्या