IPL 2020 – दिल्ली ‘कॅपिटल्स’साठी तरुणांची फौज ‘गेमचेंजर’ ठरणार, अय्यरचा गेम पुन्हा चालणार

ganesh-puranik>> गणेश पुराणिक | मुंबई

दिल्लीच्या संघाने ‘डेयरडेविल्स’ नाव बदलून दिल्ली ‘कॅपिटल्स’ (Delhi Capitals) केले, मात्र नावासोबत दिल्लीचे नशीब यंदा बदलेल का हे पाहणे औत्सुक्याचे आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्लीला आजपर्यंत ट्रॉफीवर नाव कोरता आलेले नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीच्या संघात तरुण खेळाडूंची फौज आहे. कर्णधार श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शिखर धवन, इशांत शर्मा, अमित मिश्रा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे खेळाडू दिल्लीकडे असून गेल्यावर्षी तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या दिल्लीचा संघही विजेतेपदाचा दावेदार आहे. दिल्लीचा पहिला सामना 20 सप्टेंबरला किग्स इलेव्हन पंजाबशी होणार आहे.

पहिल्या दोन मोसमात दिल्लीच्या संघाने सेमिफायनलपर्यंत मजल मारली होती, मात्र यानंतर संघाला विशेष कामगिरी करता आली नाही. मात्र गेल्या वर्षी नाव बदलल्यानंतर दिल्लीने तिसऱ्या स्थानावर झेप घेत सर्वांना चकित केले. दरम्यान, स्पर्धेत दिल्लीचा संघ पराभवाचे शतक पूर्ण करण्याच्या जवळ असून आयपीएलमध्ये आतापर्यंत 177 लढतीत 76 विजय मिळवले आणि 97 पराभव स्वीकारले. 2 लढती काही कारणास्तव रद्द झाल्या तर 2 लढती बरोबरीत सुटल्या. यात दिल्लीच्या एक विजय मिळवला, तर एका लढतीत पराभव स्वीकारला.

IPL 2020 – आरसीबी समोर विजेतेपदाचे ‘विराट’ चॅलेंज, असा आहे बंगळुरूचा संघ

ताकद
तरुण खेळाडूंची मोठी फळी असलेल्या दिल्लीची भिस्त कर्णधार श्रेयस अय्यर याच्यावर असून त्याने 62 लढतीत 1,681 धावा चोपल्या आहेत. गेल्या मोसमात त्याने 463 धावा करत संघाला प्ले ऑफ पर्यंत पोहोचवले होते. यासह एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असणारा ऋषभ पंत दिल्लीच्या संघात असून त्याने 54 लढतीत 162.69 च्या सरासरीने 1,736 धावा केल्या आहेत. तसेच सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाजात असणारा शिखर धवन दिल्लीकडे असून त्याच्या नावावर 159 लढतीत 4,579 धावा केल्या आहेत. यासह अजिंक्य रहाणे, इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जेसन रॉय, युवा फलंदाज पृथ्वी शॉ, अष्टपैलू मार्क्स स्टोयनिस, आक्रमक खेळाडू शिमरॉन हेटमेयर अशी तगडी फलंदाजी आहे. तर गोलंदाजीत गेल्या वर्षी 25 विकेट्स घेणारा रबाडा, अनुभवी इशांत शर्मा, आवेश खान, हर्षल पटेल, मोहित शर्मा, आर. अश्विन, अमित मिश्रा, ख्रिस वोक्स, नेपाळचा तरुण खेळाडू संदीप लामिछाने आणि अक्षर पटेल अशी फळी आहे.

IPL 2020 – मुंबई इंडियन्सपुढे जेतेपद राखण्याचे आव्हान, ‘ही’ आहे मुख्य अडचण

कमजोरी
पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत यांना हिंदुस्थानच्या संघातही संधी मिळाली. मात्र पंतने आपल्या अवसानघातकी खेळाने जागा गमावली, तर पृथ्वी कारकिर्दीच्या सुरुवातीलाच दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे या खेळाडूंच्या गेमवर दिल्लीचे भविष्य अवलंबून असेल. तसेच वोक्स वगळता एक चांगला अष्टपैलू खेळाडू दिल्लीच्या संघात नाही ही देखील दिल्लीची कमकुवत बाजू आहे.

Photo – आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज

दिल्लीचा संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, इशांत शर्मा, अक्षर पटेल, अमित मिश्रा, हर्षल पटेल, आवेश खान, कगिसो रबाडा, कीमो पॉल, संदीप लामिछाने, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, जैसन रॉय, क्रिस वोक्स, शिमरॉन हेटमेयर, एलेक्स कैरी, मार्कस स्टोयनिस, मोहित शर्मा, तरुण देशपांडे आणि ललित यादव.

बीडच्या अंबाजोगाई येथील ‘कलाकार’ IPL गाजवण्यासाठी सज्ज, गतविजेत्या मुंबईच्या संघात समावेश

आपली प्रतिक्रिया द्या