IPL 2020 – आयपीएलमध्ये खेळणार, मग हिंदुस्थानसाठी का नाही?

हिंदुस्थानच्या सीनियर राष्ट्रीय निवड समितीने सोमवारी ऑस्ट्रेलियन दौऱयासाठी हिंदुस्थानच्या टी-20, वन डे व कसोटी संघाची निवड केली. यामधून रोहित शर्मा व इशांत शर्मा या दोघांना दुखापतीच्या कारणामुळे वगळण्यात आले. याचवेळी निवड समितीकडून त्यांच्या दुखापतींवर देखरेख ठेवण्यात येणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले. याचा अर्थ ऑस्ट्रेलियन दौऱयासाठी त्यांची कोणत्याही क्षणी निवड होऊ शकते हे त्यांना सांगायचे होते, पण प्रत्यक्षात निवडण्यात आलेल्या संघात या दोघांनाही स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे हिंदुस्थानातील क्रिकेटप्रेमींकडून राष्ट्रीय निवड समितीवर टीका करण्यात आली.

हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावसकर हेही भडकले. यावेळी ते म्हणाले, रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी नेटमध्ये सराव करू शकतो. तर मग त्याला झालेल्या दुखापतीबाबत प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास समजण्यापलीकडील आहे. रोहित शर्माच्या दुखापती तसेच फिटनेसबाबत चाहत्यांना समजायलाच हवे.

आगामी लढतींत खेळण्याची शक्यता

रोहित शर्माने सोमवारी नेटमध्ये सराव केला. याचा अर्थ तो फिट होण्याच्या उंबरठय़ावर उभा आहे. कदाचित आयपीएलमधील आगामी लढतींमध्ये तो मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना दिसू शकतो. मुंबई इंडियन्ससाठी तो खेळल्यानंतरही बीसीसीआयकडून त्याची फिटनेस टेस्ट घेण्यात येऊ शकते. कारण आयपीएल ही प्रायव्हेट लीग आहे. त्यामुळे बीसीसीआयला त्यांच्या फिटनेस रिपोर्टवर अवलंबून राहता येणार नाहीए.

मयांक, नवदीपलाही दुखापत, मग त्यांची निवड का?

हिंदुस्थानच्या सीनियर क्रिकेट निवड समितीत सुनील जोशी, हरविंदर सिंग, देवांग गांधी, सरणदीप सिंग व जतीन परांजपे यांचा समावेश आहे. या समितीकडून रोहित शर्मा व इशांत शर्मा या दोघांना दुखापतीचे कारण पुढे करीत आगामी ऑस्ट्रेलियन दौऱयासाठी वेटिंगवर ठेवले. मयांक अग्रवाल दुखापतीमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी गेल्या दोन सामन्यांमध्ये खेळत नाहीए. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नवदीप सैनीच्या बोटाला दुखापत झालीय, मात्र या दोघांनाही टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे.

पारदर्शकता असायला हवी – सुनील गावसकर

रोहित शर्मा किंवा मयांक अग्रवाल यांच्याच नाही तर प्रत्येक खेळाडूंच्या दुखापतीबाबत पारदर्शकता असायला हवी. त्या खेळाडूची दुखापत सर्वांना समजायला हवी. रोहित दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेईल असे समजल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला लढत सुरू होण्याआधी अॅडव्हांटेज मिळेल. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाकडून हे लपवले जात आहे. हे मी समजू शकतो, पण येथे प्रश्न उपस्थित राहतोय तो देशासाठी खेळण्यासाठी. कसोटी मालिकेला अद्याप दीड महिना आहे. तरीही रोहितला दुखापतीमुळे बाहेर ठेवण्यात आले आहे, असा प्रश्न सुनील गावसकर यांनी यावेळी राष्ट्रीय निवड समितीला विचारला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या