IPL 2021 शमीचा ‘आशिर्वाद’ अन् चहरचा बळींचा ‘चौकार’, गुरु-शिष्याचा फोटो व्हायरल

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शुक्रवारी दोन ‘किंग्ज’मध्ये लो स्कोरिंग सामना रंगला. यात चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारत पंजाब किंग्जचा 6 विकेट्सने पराभव केला. पंजाबने विजयासाठी दिलेले अवघ्या 107 धावांचे आव्हान चेन्नईने 16 व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली.

प्रथम गोलंदाजी करताना चेन्नईने पंजाबच्या फलंदाजांना अवघ्या 106 धावांमध्ये रोखले. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दिपक चहर याने दमदार गोलंदाजी केली. त्याने या लढतीत 4 षटकांमध्ये अवघ्या 13 धावा देत बळींचा ‘चौकार’ ठोकला.

सामना संपल्यांतर चेन्नईच्या विजयामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या चहर याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिपक चहर पंजाबचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याच्या पाया पडताना दिसत आहे. त्यामुळे चहरच्या या दमदार गोलंदाजीमागे शमीचे ‘पाय’ असल्याची मजेशीर चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

नक्की काय घडलं?

मुंबईच्या वानखेडे मैदानावर सामना सुरू होण्यापूर्वी चेन्नई आणि पंजाबचे खेळाडू वॉर्म अप करत होते. यावेळी पंजाबचा खेळाडू मोहम्मद शमी चेन्नईचा खेळाडू सुरेश रैना आणि इमरान ताहिर यांच्याची चर्चा करत होता. याचवेळी दिपक येथे आला आणि आपला आदर्श खेळाडू शमीच्या पाया पडू लागला. मात्र शमीने मागे सरकत त्याला रोखले. याच दरम्यान कॅमेऱ्यामनने हा क्षण कैद केला.

आपली प्रतिक्रिया द्या